स्पोर्टिंगचा विजय

माफक आव्हानाचा पाठलाग करताना संथ फलंदाजीमुळे स्पोर्टिंग क्लब कमिटीला विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत थांबावे लागले.

ठाणे : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात कर्णधार निधी दावडाने षटकातील पाचव्या चेंडूवर चोरटी धाव घेत स्पोर्टिंग क्लब कमिटीला अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी क्रिकेट लीग सामन्यात पहिला विजय मिळवून दिला. डॉ राजेश मढवी स्पोर्टस असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धेतील सामन्यात स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने दहिसर स्पोर्टस क्लबने दिलेले १२० धावांचे आव्हान १९.५ षटकात १२१ धावा करत पार केले.
सेंट्रल मैदानात झालेल्या सामन्यात राधिका ठक्करची दमदार फलंदाजी दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. राधिकाने ६३ चेंडूत आठ चौकार मारत ६४ धावा केल्या. पण तिला इतर फलंदाजांनी योग्य ती साथ न दिल्याने दहिसर स्पोर्ट्स क्लबला २० षटकात ६ बाद १२० धावांवर समाधान मानावे लागले. अनिशा शेट्टीने १४ धावांत दोन फलंदाज बाद केले . तर वैष्णवी पालवने दोन विकेट्स मिळवण्यासाठी १९ धावा मोजल्या. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना संथ फलंदाजीमुळे स्पोर्टिंग क्लब कमिटीला विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत थांबावे लागले. संघाच्या विजयात मोलाचे योगदान देताना निधी दावडाने नाबाद ३० धावांचे योगदान दिले. इशीका चव्हाणने २८ आणि निव्या आंब्रेने १५ धावा केल्या. प्रियंका गोलिपकरने प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणताना १७ धावांत तीन फलंदाज बाद केले साक्षी गावडेने १५ धावा देत दोन विकेट्स मिळवल्या. निधी दावडाला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक : दहिसर स्पोर्टस क्लब – २० षटकात ६ बाद १२०( राधिका ठक्कर ६४, स्नेहल सिंग ११, वैष्णवी पालव ४-१९-२, आनिशा शेट्टी ४-१४-२) स्पोर्टिंग क्लब कमिटी :१९.५ षटकात ७ बाद १२१ ( निधी दावडा नाबाद ३०, इशिका चव्हाण २८, निव्या आंब्रे १५, प्रियंका गोलिपकर ४-१७-३, साक्षी गावडे ३-१५-२). सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : निधी दावडा.

 23,070 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.