विहंगचा सनसनाटी विजय

रंगतदार अंतिम लढतीत ग्रिफिन जिमखान्याचा केला एक गुणाने पराभव
ठाणे : रंगतदार लढतीत विहंग क्रीडा मंडळाने ग्रिफिन जिमखान्याचा एका गुणाने पराभव करत आनंद भारती समाजाने आनंद भारती महाराजांच्या १२१ व्या पुण्यतिथी चंपाषष्ठी उत्सवानिमित्ताने आयोजित ठाणे जिल्हास्तरीय कुमार गट खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विहंग क्रीडा मंडळाने हा सामना १२-११ असा विजय मिळवत तीन हजार रुपयांचे रोख बक्षिस मिळवले.
अटीतटीने लढल्या गेलेल्या सामन्यात पहिल्या डावात ग्रिफिन जिमखान्याने ६-५ अशी नाममात्र आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या डावात मात्र आक्रमक खेळ करत विहंगच्या खेळाडूंनी ग्रिफिनचा प्रतिकार मोडून काढत विजयावर शिक्कामोर्तब केले. विहंगच्या वैभव मोरेने अनुक्रमे ३.२० मिनिटे आणि २.४० मिनिटे पळतीचा खेळ करत आक्रमणात एक गडी बाद केला. आशिष गौतमने संघाच्या विजयाचा दरवाजा उघडून देताना २.३० मिनिटे आणि ३.२० मिनिटे पळतीचा खेळ करत चार गुण मिळवले. विजय देठेने दोन गुण मिळवत आपल्या सहकार्याना चांगली साथ दिली. पराभूत संघाच्या साहिल खोपडेने अष्टपैलू खेळ करताना अनुक्रमे २.२० मिनिटे आणि १.४० मिनिटे पळतीचा खेळ, आक्रमणात २ गडी बाद केले. सिद्धेश चिकणेने दोन्ही डावात प्रत्येकी २ मिनिटांचा पळतीचा खेळ करत आक्रमणात तिन गुण मिळवले. शिवराज सुर्यवंशी (१.४० मिनिटे, ३ गुण) आणि रुपेश कोंढाळकरने (१ मिनिट, २.४० मिनिटं, २ गुण) संघाचा पराभव टाळण्यासाठी निकराचे प्रयत्न केले.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मावळी मंडळाने यजमान आनंद भारती समाज संघाचा ६-४ असा २ गुण आणि ३ मिनिटं राखून पराभव केला. संस्थेचे अध्यक्ष सुभाष मोरेकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू – सर्वोत्तम सरंक्षक – वैभव मोरे (विहंग क्रीडा मंडळ), सर्वोत्तम आक्रमक – सिद्धेश चिकणे ( ग्रिफिन जिमखाना), सर्वोत्तम अष्टपैलू – आशिष गौतम (विहंग क्रीडा मंडळ)

 45,281 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.