अथर्व धोंडचे शतक; ड्रीम इलेव्हन वेंगसरकर अकादमीला जेतेपद

१० वी संतोषकुमार घोष ट्रॉफी (१६ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धा

मुंबई : सलामीवीर अथर्व धोंड याच्या दमदार शतकाच्या जोरावर ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमीला स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लबचा पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर १० व्या संतोषकुमार घोष ट्रॉफी(१६ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद जिंकता आले. आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या १०९ धावांच्या प्रत्युत्तरादाखल अकादमीने ७ बाद २७० असा पल्ला गाठल्यावर खेळ थांबविण्यात आला. अथर्वने आपल्या १०४ धावांच्या खेळीदरम्यान १७२ चेंडू खेळून काढताना १६ चौकार ठोकले. आर्यन पुंजा (६६) यांच्याबरोबर त्याने दुसऱ्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी केली. स्पोर्ट्स फिल्डच्या अनुज कोरे या डावखुऱ्या स्पिनरने ७१ धावांत ३ बळी घेतले.
स्पोर्टिंग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मुंबई क्रिकेटचे मानद सचिव अजिंक्य नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. मुंबई क्रिकेटचे माजी सचिव संजीव नाईक, अपेक्स कौन्सिलचे सभासद अभय हडप, सूरज सामत, शाह आलम यांची उपस्थिती लाभली होती. याशिवाय मुंबईचे माजी खेळाडू आणि व्यवस्थापक प्रशांत सावंत हेसुद्धा उपस्थित होते
या स्पर्धेमध्ये हृषीकेश चव्हाण (स्पोर्ट्स फिल्ड) हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने एक शतक आणि एक अर्धशतकासह २४३ धावा केल्या आणि ८विकेट्सही घेतल्या. वेंगसरकर अकादमीचा रोहन करंदीकर एका द्विशतकासह ३१८ धावा करून सर्वोत्तम फलंदाजाचा बहुमान प्राप्त केला. स्पर्धेतील उत्तम गोलंदाजाचा पुरस्कार गे कॅव्हेलियर्सच्या कार्तिकेय शुक्लाने पटकाविला. त्याने स्पर्धेमध्ये १८ विकेट्स घेतले.
संक्षिप्त धावफलक
स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब :४०.५ षटकांत १०९ (श्रेयस लाड २३, अनुज कोरे नाबाद ३३, अनिश तांबे ३१/४, निकष नेरुरकर २९/६) पराभूत विरुद्ध ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमी : ७ बाद २७० (अथर्व धोंड १०४, आर्यन पुंजा ६६, जय नाडर नाबाद २९, अनुज कोरे ७१/३) सामनावीर ः निकष नेरुरकर.

 182 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.