संतोषकुमार घोष (१६ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धा
मुंबई : डावखुरा स्पिनर निकष नेरूरकर (२९/६) आणि ऑफ स्पिनर अनिश तांबे (३१/४) यांनी स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लबला ४०.५ षटकांत अवघ्या १०९ धावांत गुडाळल्यानंतर ड्रीम इलेव्हन दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीने दिवसअखेरीस ४२ षटकांत १ बाद १७४ धावा फटकावत संतोषकुमार घोष (१६ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर मजबूत पकड घेतली. शिवाजी पार्क जिमखान्यावर खेळल्या जात असणाऱया सामन्यामध्ये ड्रीम इलेव्हन दिलीप वेंगसरकर अकादमीच्या अथर्व दौंड (नाबाद ९२) आणि आर्यन पुंजा (नाबाद ६२) यांनी मनमुराद फटकेबाजी करून दुसऱया विकेटसाठी १३८ धावांची अभेद्य भागीदारी रचली. दौंडने १३८ चेंडूंचा मुकाबला करत शतकाच्या समीप जाताना १४ चौकार ठोकले.
आज सकाळी स्पोर्ट्स फिल्डचा नाणेफेकीच्या कौलानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय अंगाशी आला. सलामीवीर साईराज सानप संघाची ३३ धावसंख्येवर प्रथम बाद झाल्यानंतर त्यांच्या फलंदाजीला जी गळती लागली ती काही थांबली नाही. अनिशने साईराजला बाद केल्यावर निकषने स्थितीवर ताबा घेत प्रतिस्पर्धांची मधली फळी नेस्तनाबूत केल्याने स्पोर्ट्स फिल्डची ६ बाद ६८ अशी दयनीय स्थिती झाली. आठव्या क्रमांकावरील अनुज कौरेने ६चौकारांसह नाबाद ३३ धावा केल्या नसत्या तर त्यांच्या संघाला शंभर धावांचा टप्पा पार करता आला नसता.
स्पोर्टिंग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मुंबई क्रिकेटचे नवनिर्वाचित अध्यक्ष उद्योजक अमोल काळे, सचिव अजिंक्य नाईक, माजी सचिव संजीव नाईक आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब ४०.५ षटकांत १०९ (श्रेयश लाड २३, अनुज कोरे नाबाद ३३, अनिश तांबे ३१ धावांत ४ बळी, निकष नेरूरकर २९ धावांत ६ बळी) विरुद्ध ड्रीम इलेव्हन दिलीप वेंगसरकर अकादमी ४२ षटकांत १ बाद १७४ (अथर्व दौंड खेळत आहे ९२, आर्यन पुंजा खेळत आहे ६२).
271 total views, 1 views today