ठाणे, पुणेचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत लढणार

५८ वी पुरुष-महिला राज्य अंजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा, हिंगोली

हिंगोली : आज तिसर्‍या दिवशीच्या झालेल्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात मुंबई उपनगर, रत्नागिरी, उस्मानाबाद, ठाणे, सांगली, पुणे संघांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले. पुरुषांमध्ये ठाणे विरुध्द पुणे व मुंबई उपनगर विरुध्द सांगली तर महिलांमध्ये पुणे विरुध्द रत्नागिरी व उस्मानाबाद विरुध्द ठाणे उपांत्य फेरीत लढणार
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने हिंगोली जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली तालुका खो-खो असोसिएशन आयोजित ५८ वी पुरुष व महिला राज्य अंजिक्यपद व निवडचाचणी खो-खो स्पर्धा रामलिला मैदानात सुरू आहे.
महिला गटात उपांत्यपूर्व सामन्यात चुरशीच्या सामन्यामध्ये रत्नागिरीने सांगलीचा ३ गुणांनी (१०-७) पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मध्यंतराला रत्नागिरीकडे २ गुणांची आघाडी होती. ती आघाडी सांगली संघाला मोडता आली नाही. विजयी संघातर्फे अपेक्षा सुतार (२.१०, २.२० मि. संरक्षण आणि ४ गुण), आरती कांबळे (२.२०, २.१० मि. संरक्षण व २ गुण), ऐश्‍वर्या सावंत (२.५० मि. संरक्षण), श्रेया सनगरे (२.१० मि. संरक्षण व २ गुण) तर पल्लवी सनगले (१.४०, नाबाद १.२० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. सांगलीतर्फे प्रतिक्षा बिराजदार (२.१०, १.५० मि. संरक्षण व १ गुण), साक्षी पाटील (२.१० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी पराभव टाळण्यासाठी प्रयत्न केला.
महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात उस्मानाबादने मुंबईचा एक डाव १२ गुण (१७-५) पराभव केला. उस्मानाबादतर्फे अश्‍विनी शिंदे (३ मि. संरक्षण व ३ गुण), संपदा मोरे (३ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी तर मुंबईतर्फे मानसी आंबोकरने (१ मि. संरक्षण) चांगला खेळ केला.
महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात ठाणेने सोलापूरवर १० गुणांनी (२१-११) मात केली. ठाणेतर्फे रुपाली बडे (३.१०, २.१० मि. संरक्षण), गितांजली नरसाळे (१.४० मि. संरक्षण), पुजा फरगडे (५ गुण) यांनी चांगला खेळ केला.
महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याने नाशिकचा १ डाव ५ गुणांनी (११-६) धुव्वा उडवल. पुण्यातर्फे प्रियांका इंगळेने (३.२० मि. संरक्षण व ६ गुण), स्नेहल जाधव (३ मि. संरक्षण) यांनी चमकदार कामगिरी केली.
पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात ठाण्याने मुंबईचा १५-१४ असा १ गुण आणि ८ मिनिटे राखून विजय मिळवला. गजानन शेंगाळ (१.१०, १.३० मि. संरक्षण व ३ गुण), संकेत कदम (१.३०, १.२० मि. संरक्षण व २ गुण), लक्ष्मण गवस (१.५०, १ मि. संरक्षण व १ गुण) यांची चमकदार कामगिरी करत विजयात मोलाची कामगिरी केली. मुंबईतर्फे विश्‍वजित कांबळे (१.३० मि. संरक्षण व १ गुण), वेदांत देसाई (४ गुण) यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई उपनगरने नाशिकचा १४-९ असा १ डाव ५ गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे अनिकेत चंदवणकर (३, १.५० मि. संरक्षण), अक्षय भांगरे (३ मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ केला.
पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात सांगलीने सोलापूर १५-१३ असा दोन गुण आणि आठ मिनिटे राखून पराभव केल. विजय संघातर्फे सुरज लांडे (२, १.४० मि. संरक्षण व २ गुण), अक्षय मासल (१.१०, १.३० मि. संरक्षण व ३ गुण ) यांनी तर सोलापूरतर्फे अक्षय इंगळे (१.१० मि. संरक्षण) चांगला खेळ केला.
पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याने उस्मानाबादचा १२-१० असा २ गुण आणि ७ मि. राखून पराभव केला. पुणे तर्फे आदित्य गणपूळे (२,२ मि. संरक्षण व १ गुण ), प्रतिक वायकरने (१.१०, २, मि. संरक्षण व २ गुण ) चांगला खेळ करत विजय मिळवून दिला. उस्मानाबादतर्फे विजय वसावेने (१.१४, १.१० व १ गुण) चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.

 213 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.