ठाण्यातील महिला पत्रकारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
ठाणे : टिकली संदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनी केवळ महिला पत्रकारांचीच नव्हे तर समस्त महिलांची माफी मागावी अशी मागणी आज ठाणे महिला पत्रकारांनी केली. यासंदर्भाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले असून हे निवेदन आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिले. टिकली वरून सध्या सर्व स्तरातून मतमतांतरे व्यक्त होत असताना राज्यात सर्वप्रथम ठाण्यातील महिला पत्रकारांनी आपली भूमिका स्पष्ट करत संताप व्यक्त केला आहे.
बुधवार,२ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात एक महिला पत्रकार संभाजी भिडे यांना प्रश्न विचारत असताना ‘तू आधी कुंकू लावून किंवा टिकली लावून ये, मग तुझ्याशी बोलेन. स्त्री ही भारत माता आहे आणि भारत माता विधवा नाही असे वक्तव्य केले. पुरोगामी महाराष्ट्रात असे वक्तव्य करणे ही अत्यंत निंदनीय आणि निषेधार्य बाब आहे. एखाद्या महिलेने टिकली लावावी की नाही हा संपूर्णपणे तिचा वैयक्तिक अधिकार आहे. भारतीय संविधानाने नेहमीच स्त्रीचा आदर राखला आहे. अशावेळी संभाजी भिडे यांचे वक्तव्य समस्त महिलांचा अपमान करणारे आहे. ठाणे महिला पत्रकारानी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
टिकली लावावी की नाही हे प्रत्येक महिलेचा वैयक्तिक मत आहे. कपाळावरील टिकली टीकण्यापेक्षा महिलेची अस्मिता टिकणे गरजेचे आहे. सध्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत त्यामुळे कर्तुत्व बघितलं गेलं पाहिजे. असे मत महिला पत्रकारांनी व्यक्त केले. तसेच अश्या प्रकारचे बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनी जाहीर माफी मागावी आणि पुन्हा अशी घटना घडणार नाही अशी दखल घ्यावी अशी मागणी महिला पत्रकरांकडून करण्यात आली आहे. आपला निषेध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी महिला पत्रकारांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना निवेदन देखील दिले आहे. त्यावेळी महिला पत्रकार हेमलता वाडकर, प्रज्ञा म्हात्रे, जयश्री शेट्टी, रोहिणी दिवाण, अनुपमा गुंडे, सुचिता बिराजदार, सारिका साळुंखे, नम्रता सूर्यवंशी, संपदा शिंदे, अनघा सुर्वे, स्नेहा जाधव ह्या उपस्थित होत्या. तसेच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार सहकारी तसेच डिजिटल मीडियाचे सदस्य ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाण्यातील महिला पत्रकारांनी #माझीटिकली #माझीमर्जी हा hashtags सोशल मीडियावर सुरू केलेला आहे आणि भारतातील सर्व महिला पत्रकारांनी देखील ह्यात सहभाग घेत भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करावा असे आवाहन देखील केले.
17,806 total views, 1 views today