दहावी संतोषकुमार घोष (१६ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धा
मुंबई : काल ३ बाद ४५६ डाव घोषित असा डोंगर रचणाऱया दिलीप वेंगसरकर अकादमीने आज आपले प्रतिस्पर्धी पय्याडे स्पोर्टस् क्लबचा केवळ १३४ धावांत खुर्दा करून १०व्या संतोषकुमार घोष (१६ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या दिवशी रोहन करंदीकर (२०० नाबाद) आणि हर्ष आघाव (१७६) यांनी गाजविल्यावर डावरा स्पिनर अगस्त्य बंगेरा (५०/ ६) आणि दर्श मुरकुटे (४८/४) यांनी आपली भूमिका समर्थपणे पार पाडली. त्यांनी आदित्य विश्वकर्मा (३६) आणि शौर्य शरण (४४) यांचा अपवाद वगळता बाकी फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही.
स्पोर्टिंग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस् फाऊंडेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये मुंबई पोलीस जिमखाना, दादर पारशी कॉलनी आणि स्पोर्टस्फिल्ड या अन्य तीन संघांनी शेवटच्या चारमध्ये प्रवेश प्राप्त केला. स्पोर्टस्फिल्डच्या हृशिकेष चव्हाण याने दुसऱया डावात १२८ धावांची शानदार खेळी केली. त्याने ११७ चेंडूंचा मुकाबला केला व त्यादरम्यान २० चौकार मारले. त्यामुळे गे कॅव्हेलियर्सला सामना निर्णायकपणे जिंकण्याच्या उरल्यातसुरल्या असणाऱ्याआशा मावळल्या. स्पोर्टस्फिल्डने पहिल्या डावात ६२ धावांची आघाडी घेतली होती. त्यांनी दुसऱ्या डावात २८० धावा केल्या.
आता उपांत्य फेरीत दिलीप वेंगसरकर अकादमी विरुद्ध मुंबई पोलीस जिमखाना आणि स्पोर्टस्फिल्ड विरुद्ध दादर पारशी कॉलनी अशा लढती ३-४ नोव्हेंबर रोजी होतील. स्पर्धेचा अंतिम सामना ८-९ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर होईल.
324 total views, 1 views today