मराठी नामफलक नसल्यामुळे दुकानदारांना साडे तीन लाख रुपयांचा दंड


 
ठाणे जिल्ह्यातील दुकाने व व्यापारी आस्थापनांची नामफलक मराठी, देवनागरी लिपित प्रदर्शित करण्याचे कामगार विभागाचे आवाहन
 
 
ठाणे : दुकाने व व्यापारी आस्थापनांवरील फलक मराठी, देवनागरी लिपित प्रदर्शित न करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे १५३ दुकाने/व्यापारी आस्थापना मालकांविरुद्ध महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियम, २०१७ (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नुसार कामगार उप आयुक्त कार्यालयाने फौजदारी कारवाई केली आहे. तसेच १५ दुकान मालकांना सुमारे साडेतीन लाख दंड आकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील दुकान, आस्थापनांनी आपल्या आस्थापनांचे नामफलक मराठी, देवनागरी लिपीमध्ये करावे, असे आवाहन कामगार उपायुक्त सं.सं. भोसले यांनी केले आहे.
शासनाने प्रत्येक दुकाने व व्यापारी आस्थापनांचे नाम फलक मराठी , देवनागरी लिपित प्रदर्शित करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियम, २०१७ (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) मधील नियमामध्ये बदल केलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये तपासणी मोहिम हाती घेण्यात आलेली होती. त्यामध्ये ४५७ दुकाने व व्यापारी आस्थापनांना निरीक्षण भेटी देण्यात आल्या होत्या. त्यातील ३०४ दुकानांची, आस्थापनांची नावे मराठीमध्ये असल्याचे आढळून आले. मात्र, मराठी नामफलक प्रदर्शित न केलेल्या १५३ दुकाने- व्यापारी आस्थापनांच्या मालकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. तसेच अधिनियमातील तरतुदी नुसार १५ आस्थापना मालकांनी कामगार उप आयुक्त तथा प्रशमन अधिकाऱ्यांकडे गुन्हा मान्य केल्याने आढळून आलेल्या त्रुटींच्या पुर्ततेसह १५ आस्थापना मालकांना ३ लाख ४९ हजार ५०० रु. इतके प्रशमन शुल्क, दंड करण्यात आला आहे. यापैकी एका आस्थापना मालकाला २ लाख ८६ हजार प्रशमन शुल्क ,दंड आकारण्यात आला असल्याची माहिती भोसले यांनी कळविली आहे.
 ठाणे जिल्ह्यातील दुकाने व व्यापारी आस्थापना मालकांनी आपल्या आस्थापनेचा नामफलक विहित पध्दतीने मराठी,देवनागरी लिपित प्रदर्शित करावा, अन्यथा महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियम, २०१७ (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) मधील तरतुदी नुसार कामगार उप आयुक्त कार्यालयामार्फत कारवाई करण्यात येईल, असे कामगार उप आयुक्त भोसले यांनी कळविले आहे.

 40,206 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.