शनिवारपासून स्पर्धा : महाराष्ट्र, विदर्भ व कोल्हापूरसह देशातील ३२ राज्याचे संघ भाग घेणार
मुंबई :३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन २९ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर या कालावधीत आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुल, घडसोली, फलटण, सातारा येथे होणार आहे. सदर राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली संपन्न होणार आहे. या खो-खो स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून सातारा जिल्ह्यातील फलटणनगरी सज्ज झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:०० वाजता होणार आहे.
महाराष्ट्र खो खो संघटनेचे अध्यक्ष व स्पर्धा अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. या स्पर्धेसाठी चार मैदाने तयार केली असून त्यातील एक मैदान मॅटचे तयार केले आहे. सर्व मैदानावर विद्युत झोताची तयारी करण्यात आली आहेत. तसेच पन्नास हजार प्रेक्षकांसाठी भव्य अशी प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली असल्याचे सातारा जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव व स्पर्धा सचिव महेंद्र गाढवे यांनी सांगितले.
या स्पर्धेत यजमान महाराष्ट्र, विदर्भ व कोल्हापूरसह देशातील विविध राज्याचे ३२ किशोर व ३२ किशोरीचे संघ भाग घेणार आहेत. महाराष्ट्राच्या किशोर संघाने २०१४-१५ या वर्षापासून सलग सहाव्यांदा विजेतेपद पटकाविले आहे. गतवर्षी उना, हिमाचलप्रदेशमध्ये झालेल्या ३१ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी विजेतेपद पटकाविले होते. किशोर संघास गतउपविजेत्या कर्नाटक आणि किशोरी संघास पंजाबचे आव्हान असणार आहे. दोन्ही संघाचे सराव शिबीर फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असून यंदाही दोन्ही संघ विजेतेपद कायम राखतील, असा विश्वास त्यांचे प्रशिक्षक प्रफुल्ल हाटवटे, अमित परब यांनी व्यक्त केला आहे.
345 total views, 2 views today