महानगरातील तीनपैकी एक महिला हाडांच्या त्रासांनी त्रस्त

जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस
मुंबई : ऑक्टोबर रोजी जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस साजरा केला जातो. ऑस्टियोपोरोसिसच्या प्रतिबंध, निदान आणि उपचारांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो. ऑस्टियोपोरोसिस हा शब्द ग्रीक आणि लॅटिन भाषेतील आहे. ‘ऑस्टियो’ म्हणजे हाडे आणि ‘पोरोसिस’ म्हणजे छिद्रांनी भरलेले. हा हाडांचा आजार आहे, ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. वृद्ध महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिस हा आजार रजोनिवृत्तीनंतर अथवा वृद्धत्वाकडे झुकतानाच्या काळात होतो. इतर गंभीर आजार, दीर्घकाळ घ्यावी लागलेली विशिष्ट औषधे किंवा सदोष जीवनशैलीमुळेही हा आजार होतो. याविषयी अधिक माहिती देताना बोरीवली येथील अपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे अस्थिव्यंग तज्ञ व शल्यविशारद डॉ. अमित मुंडे म्हणाले , ” मेनोपॉज व वाढत्या वयानुसार महिलांमध्ये ‘इस्ट्रोजेन’ या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे हाडांचा ऱ्हास होतो. त्यामुळे हाडे ठिसूळ होऊन त्यांचे वजन कमी होते, ती हलकी होतात. परिणामी पाठीच्या कण्याचे वा मनगटाचे हाड मोडणे ही या आजारात सामान्य बाब होऊन जाते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने वयाच्या चाळिशीनंतर आपल्या हाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. या आजारामध्ये शरीरातील कॅल्शियमचे शोषण कमी होते. ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी कमी होण्यासारखी लक्षणे आढळतात. यामध्ये हाडांच्या आतील सर्व भागांवर दुष्परिणाम होतो. विशेषत: पडल्यावर कंबरेच्या हाडांना दुखापतीची शक्यता वाढते. ज्यांची देहयष्टी अथवा बांधा एकदमच बारीक आहे, हाडे कमकुवत आहेत, अशा लोकांनाही ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका असतो. नियमित व्यायाम, कॅल्शियम व जीवनसत्त्व ‘ड’ असलेला आहार आणि धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहिल्याने ऑस्टिओपोरोसिसपासून दूर राहणे आणि फ्रॅक्चर टाळणे शक्य आहे. साधारणपणे तीनपैकी एका महिलेला आणि बारापैकी एका पुरुषाला ओस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता असते. ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडांना फ्रॅक्चर होण्याच्या वर्षभरात सरासरी ३ लाखांहून अधिक घटना घडतात.गुणसूत्रांमुळे, मेनोपॉझमुळे आणि वंशपरंपरेनं चालत आलेला ओस्टिओपोरोसिस रोखणं कठीण आहे; पण तुम्ही जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणत, हाडांची शक्ती, घनता वाढवू शकता. ऑस्टिओपोरोसिस हा आजार मधुमेह ,उच्च रक्तदाब व मूत्रपिंडाच्या आजारांसारखा खर्चिक व त्रासदायक असून प्राथमिक अवस्थेत यावर उपचार घेणे महत्वाचे आहे”
हाडांची ठिसूळता टाळण्यासाठी काय करावे
धूम्रपान व मद्यपानाचा दुष्परिणाम हाडांवर होतो, त्यामुळे ते दोन्ही टाळावे.
कॉफीच्या अतिसेवनाने हाडांवर दुष्परिणाम होतो
डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘ड’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या व इंजेक्शनचा वापर करावा.
आहारात कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
दररोज किमान १५ ते २० मिनिटे उन्हात बसा.
दररोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करा किंवा खेळा.

 175 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.