कोकणातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी द्या

आमदार डावखरे यांची ग्रामविकासमंत्र्यांकडे मागणी

ठाणे : कोकणात काही वर्षांपासून सातत्याने अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय निधीतून तरतूद करावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.
कोकणाला दरवर्षी महापूर व चक्रीवादळाचा फटका बसत असून, जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी शाळा मोडकळीला आल्या आहेत. या शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून प्राप्त होणारा निधी अत्यल्प असल्याने शाळांची दुरुस्ती करता येत नाही. काही ठिकाणी पडझड झालेल्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे राज्यस्तरीय निधीतून जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे आमदार डावखरे यांनी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले आहे.

 265 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.