सी. डी. देशमुख प्रशासाकीय प्रशिक्षण संस्थेत एमपीएससी मार्गदर्शन वर्ग सुरू करा 

नवनियुक्त ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या भेटीत मनविसे शिष्टमंडळाची मागणी
ठाणे : स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम प्रावीण्य मिळवून देण्यात राज्यात अग्रेसर असलेल्या सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत एमपीएससी मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. ठाणे पालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांची मनविसे शिष्टमंडळाने भेट घेत ही मागणी केली असून ठाणे शहराबाहेरील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे यूपीएससी अभ्यासक्रमासोबत एमपीएससीकरिता प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
ठाणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट मनविसेच्या शिष्टमंडळाने घेतली.
ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत नव्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याची मागणी मनविसेमार्फत करण्यात आली. या शिष्टमंडळात मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे, शहर अध्यक्ष निलेश वैती, शहर संघटक प्रमोद पत्ताडे, अमित मोरे, मयूर तळेकर, राकेश आंग्रे यांचा समावेश होता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व तत्सम स्पर्धा परीक्षा याकरिता लागणारी गुणवत्ता महाराष्ट्र राज्याच्या विविध ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाकरिता महाराष्ट्र राज्यात सारथी, बार्टी व महाज्योती आदि शासकीय प्रशिक्षण केंद्र उपलब्ध असून या संस्थेत विद्यार्थी क्षमता मर्यादित असल्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अपेक्षित यश संपादन करता येत नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर परीक्षेचे स्वरूप नव्याने तयार केल्यामुळे स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यांच्यासाठी परीक्षेच्या नवीन स्वरूपानुसार मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची उभारणी करणे आवश्यक असल्याचे मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी आयुक्तांना भेटीदरम्यान सांगितले.
वसतिगृहाची सोय करा
ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेचा नावलौकिक तसेच यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षेतील उत्कृष्ट कामगिरी पाहता मुंबई ठाणे व उपनगर शहरे आणि महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भागातील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना या संस्थेत पूर्ण वेळ एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केंद्र सुरू करावे व ठाणे शहरा बाहेरील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निवेदनात नमूद केले आहे.

 16,620 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.