माजीवडा ते वडपे मार्गवरील आठपदरी रस्त्याचे काम तीन वर्षे रखडले. नवीन साकेत व कशेळी पूलाचे कामही ६ टक्केच पूर्ण, ११८२ कोटीचा प्रकल्प अपूर्ण स्थितीत.
ठाणे : ठाण्यातून जाणाऱ्या माजिवडा ते वडपे हा राष्ट्रीय महामार्गाचा वापर मुंबई, ठाणे, नाशिक, गुजरात आणि पनवेल या महत्त्वाच्या शहरांना जाण्यासाठी वापरला जातो. मात्र २३.५ किलोमीटरचा हा माजिवडा ते वडपेच्या राष्ट्रीय महामार्ग ३ च्या रस्त्याच्या आठपदरीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ठाण्यासह मुंबईकरांनाही दोन-दोन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या कामातील हालगर्जीपणाचा फटका मात्र सर्वसामन्य ठाणेकरांना बसत आहे. तर नवीन साकेत आणि कशेळी पूलाचे काम तर केवळ ६ टक्केच झाल्याचे अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले आहे. याप्रश्नी काम मुदतीत पूर्ण करण्याबाबत मनसेचे जनहित विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच एमएसआरडीसी प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आले.
माजिवडा ते वडपे राष्ट्रिय महामार्गाचे आठपदरीकरण आणि नवीन साकते व कशेळी पुलाचे काम असा संपूर्ण प्रकल्प २०१८ मध्ये मंजूर झाला. या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने प्रथम अमईपी इनफ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले होते . पण हे काम करण्यास असमर्थ असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे काम एसएसआरडीसीला २०२१ ला सोपिवण्यात आले. तर नवीन साकेत पुलाचे काम तीन वर्षांपासून रखडलेले आहे. हा प्रकल्प २०२३ अखेर संपविण्याबाबत निर्देश दिले आहेत. मात्र या पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्ष लागणार असल्याचे महारष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता रामचंद्र डोंगरे यांनी सांगितले.
तर माजीवडा ते वडपे या मार्गावरील काही जागा ही वनविभागाकडे येत असल्यामुळे त्यांच्या परवानगी घेण्यात आल्या आहेत.आता या मार्गावरील रस्त्याचे काम करण्यासाठी कोणत्याही अडचणी नसून डिसेंबर २०२३ अखेर लवकरच या आठपदरिकरण रस्त्याचे व पूलाचे काम पूर्ण करू. तर सध्या साकेत आणि कशेळी पूलाचे काम ही सुरू असून ६ टक्के काम झाले आहे. हा संपूर्ण प्रकल्प ११८२ कोटींचा असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले.
या रस्त्यावर असलेल्या साकेत आणि कशेळी पुलावरील रस्ता अत्यंत खराब झाल असून यामुळे ठाण्याच्या वेशीवर वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. एमएसआरडीसी प्राधिकरणाने त्वरीत खड्डे बुजविण्याची आवश्यकता असून दोन्ही पुलाचे काम लवकर पूर्ण झाल्यास ठाणेकरांना वाहतूक कोंडीपासून मुक्तता मिळेल.
दररोज लाखो वाहने या रस्त्यावर धावत असतात. मात्र केवळ प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संबंधित ठेकेदार, एमएसआरडीसी प्राधिकरण यांच्याकडून नियोजित वेळेत काम पूर्ण करून घेण्यास असमर्थ ठरत आहे. दरम्यान या प्रश्नी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच एमएसआरडीसी प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांना भेटून याप्रश्नी निवेदन दिले असून हा प्रकल्प मुदतीत न संपल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
स्वप्नील महिंद्रकर, शहर अध्यक्ष, मनसे जनहित व विधी विभाग
7,737 total views, 1 views today