फेरीवाल्यावर गुन्हे दाखल करण्याची `आरपीएफ’कडे मागणी
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वेपुलावर प्रवाशी महिलेला झालेल्या मारहाणीनंतर, बेकायदा फेरीवाल्यांविरोधात भाजयुमोने आक्रमक भूमिका घेऊन फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रेल्वे सुरक्षा बलाकडे (आरपीएफ) केली आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानकाच्या परिसरात महिलांची सुरक्षितता धोक्यात आल्याचा आरोप करून स्वाक्षरी मोहीम हाती घेतली.
रेल्वे पुलावर महिलेला झालेल्या मारहाणीनंतर प्रवाशी व विविध संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांकडून आवाज उठविल्यानंतर, ठाणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून फेरीवाले गायब झाले होते. मात्र, फेरीवाल्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी. फेरीवाल्यांमुळे महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याकडे लक्ष वेधून भाजयुमोच्या कोकण सहसंयोजिका वृषाली वाघुले यांनी रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम घेतली. तसेच `आरपीएफ’चे प्रभारी निरीक्षक प्रताप भानसिंह यांना निवेदन देऊन फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. भाजपाचे माजी नगरसेवक संजय वाघुले व वृषाली वाघुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात प्रशांत कळंबटे, मुकेश काळे, संजय लाड, शरीफ शेख, हनीफ खान, अनिकेत मुळे, दिलीप मिश्रा, शुभम गुप्ता, प्रवेश तिवारी, विशाखा कनकोसे, कमल सावळे, राणी क्षीरसागर, वंदना शिंदे, सुनिता वाघुले, भक्ती मोहिते आदींचा समावेश होता.
ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये असुरक्षिततता आहे. यापूर्वीही फेरीवाल्यांच्या अरेरावीचा अनेक महिला व पुरुष प्रवाशांना फटका बसला आहे. मात्र, फेरीवाल्यांच्या दहशतीमुळे प्रवाशांनी तक्रारी दाखल केलेल्या नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. फेरीवालामुक्त ठाणे रेल्वे स्टेशन होण्यासाठी दररोज महिलांवर हल्ला होण्याची रेल्वे पोलिस बल वाट पाहत आहे का, प्रवाशांचा खून होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा सवाल निवेदनाद्वारे विचारण्यात आला आहे.
विनापरवानगी घुसखोरीच गुन्हा दाखल करावा
रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरातून फेरीवाले हटवावेत. यापुढे रेल्वे स्थानकाच्या हद्दीत आढळलेल्या बेकायदा फेरीवाल्यांवर रेल्वेच्या मालमत्तेत विनापरवानगी घुसखोरी केल्याचा गुन्हा दाखल करावा. या प्रसंगी सातत्याने सीसीटीव्हींची तपासणी करून फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपाच्या कोकण सहसंयोजिका वृषाली वाघुले यांनी केली आहे.
16,431 total views, 1 views today