ठाण्याच्या लुईसवाडीत प्रकटली ‘तुळजाभवानी’

यंदाच्या नवरात्रौत्सवात जय माता शेरावली मित्र मंडळाने साकारला ‘प्रति तुळजापूर’चा देखावा
ठाणे : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानीची हुबेहूब प्रतिकृती ठाण्यातील लुईसवाडी येथील जय माता शेरावली मित्र मंडळाच्या नवरात्रौत्सवात साकारण्यात आली आहे. तुळजाभवानीच्या मंदिराची प्रतिकृतीदेखील मंडळाने उभारली असून याठिकाणी प्रति तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची कुलस्वामीनी अशी ओळख असलेल्या देवीच्या मूर्तीची प्रतिकृती यंदा लुईसवाडी येथील संतोषी माता चौकात असलेल्या जय माता शेरावली मित्र मंडळात विराजमान झाली आहे. ठाण्यातील मूर्तिकार नागराज पाटील यांनी ही प्रसन्न मूर्ती साकारली असून ‘लाईट अँड शेड्स’च्या माध्यमातून तुळजाभवानीच्या मंदिराचा नयनरम्य देखावा उभारण्यात आला आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. त्या प्रवेशद्वाराची प्रतिकृतीदेखील येथे उभारण्यात आली आहे. त्यामुळे भक्तांना यंदाच्या नवरात्रौत्सवात प्रति तुळजापूरच्या रूपाने कुलस्वामिनीचे दर्शन ठाण्यातच घेणे शक्य होणार असल्याची माहिती उत्सवाचे आयोजक पप्पू सिंह यांनी दिली. तसेच मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान, आरोग्य शिबीर, महिलांसाठी सांस्कृतिक उपक्रम आयोजित केल्याचे मंडळ प्रमुख अशोक पार्टे यांनी सांगितले.

 43,323 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.