क्षत्रिय वेखंडे ठरला कँडिडेट मास्टर


वयाच्या १२ व्या वर्षी २२२४ फिडे गुणांसह मिळवला बहुमान
ठाणे : वयाच्या १३ व्या वर्षाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या क्षत्रिय नितीन वेखंडेने अवघ्या महिनाभराच्या कालावधीत २२२४ फिडे गुणांची कमाई करत जागतिक बुद्धिबळ संघटनेचा (फिडे) कँडिडेट मास्टर ‘किताब आपल्या नावे केला.
चेस गुरु अकॅडमीत अमित पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचा सराव करणाऱ्या क्षत्रियने जुलै ते ऑगस्ट अशा महिनाभराच्या कालावधीत स्पेन येथे खेळल्या गेलेल्या चार विविध स्पर्धामध्ये आपली छाप पाडत हा ‘किताब मिळवला.या स्पर्धामध्ये सहभागी होण्याआधी क्षत्रियच्या नावावर १७८२ फिडे गुण जमा होते. क्षत्रियने या स्पर्धामध्ये आपल्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्या बुद्धिबळपटूंना मात देत एकूण २२२४ गुणांसह कँडिडेट किताबाला गवसणी घातली. याआधी क्षत्रियने गतवर्षी १२ वर्षाखालील वयोगटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
क्षत्रियच्या जोडीने त्याचा भाऊ वेदांतनेही या चार स्पर्धामध्ये प्रभावी कामगीरी करत आपली दाखल घ्यायला लावली. या स्पर्धामधून वेदांतने १७३१ गुणावरून २१७८ फिडे गुणांवर झेप घेतली. यासंदर्भात त्यांचे प्रशिक्षक अमित पांचाळ म्हणाले करोना महामारीमुळे क्षत्रिय आणि वेदांतला स्पर्धामध्ये सहभागी होण्यात मर्यादा आल्या होत्या. पण नाउमेद न होता या दोघांनीही अभ्यास आणि खेळाची सांगड आपला ऑनलाईन सराव सुरु ठेवला होता. त्याचे चांगले फळ त्यांना मिळाले आहे. आता भविष्यातही असाच खेळ करून अनेकानेक स्पर्धा जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

 272 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.