एस कुमार ज्वेलर्सचे श्रीकुमार शंकरा पिल्लईला अटक; ठाणे पोलिसांची कामगिरी

ठाणे : मासिक भिशी योजना, फिक्स डिपॉझीट योजना आणि त्याच्यावर १८ टक्के व्याजदराचा परतावा अशा अशक्यप्राय परताव्याचे अमिष दाखवून गुंतवणुकदारांकडुन लाखो रूपयाच्या ठेवी स्विकारून त्यांची परतफेड न करता फसवणुक करणाऱ्या श्रीकुमार शंकरा पिल्लई याला ठाणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अखेर अटक केली. त्याला येत्या १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्याने आतापर्यंत एकूण १ हजार २१६ गुतवणुकदारांची ५७ कोटी ८९ लाख ३७ हजार ३७१ रुपयांची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. परंतु फसवणूक रक्कम सुमारे ७० कोटी पेक्षा जास्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
श्रीकुमार शंकरा पिल्लई याने एस कुमार ज्वलेर्स आणि एस.कुमार गोल्ड अॅन्ड डायमंड या नावाने सोन्याचे दागिणे विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. त्याने त्याची महाराष्ट्र राज्यातील विविध शहरात तसेच देशातील इतर ठिकाणी सुध्दा कार्यालय सुरू केली. अशाप्रकारे कल्याण शिवाजी चौकात कार्यालय उघडण्यात आले होते. तो त्याचे दुकानात सोन्याचे दागिणे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना तसेच दलालमार्फत गुंतवणूकदारांना त्यांनी ११ महिने रक्कम भरल्यास १२ व्या महिन्यांची रक्कम ही त्यांचे ज्वेलर्सचे मार्फत भरुन जमा होणाऱ्या रक्कमेचे सोने खरेदी करता येवू शकते. तसेच एक वर्ष मुदतठेवी पोटी गुंतवणुक केल्यास सदर गुंतवणुक रक्कमेवर परतावा म्हणून सुमारे १६ ते १८ टक्के दराने व्याज मिळेल अशा वेगवेगळया स्किम समजावून सांगून लोकांना अशक्यप्राय अशा आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत त्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. संबंधित गुंतवणूकदारांकडून सुमारे १ वर्ष मुदतीसाठी ठेवी स्विकारुन सदरच्या ठेवींची मुदत संपलेनंतर गुंतवणूकदारां मूळ रक्कम तसेच मिळणारे व्याजाची रक्कम अशी सर्व रक्कम पुन्हा मुदत ठेवीमध्ये गुंतवण्यास प्रवृत्त करीत. त्या प्रलोभनास बळी पडून यातील फिर्यादी यांनी १० दहा रुपये गुंतविले. पण त्यांना मुदतीनंतर परतावा न मिळाल्याने त्यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर या गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या तपासामध्ये पोलिसांनी त्याचे व त्याचे कंपनीचे नावे विविध बँकेत असलेल्या २४ खात्यामधील एकुण रक्कम १२ लाख ८४ हजार ४७६ रुपये गोठविण्यात आले. तसेच त्याच्या मालकीच्या संरक्षित करण्यात आलेल्या मालमत्तेची सद्याची किंमत सुमारे ६० कोटी इतकी आहे. त्याला १३ सप्टेंबर ला अटक केली असून या गुन्हयात असंख्य गुंतवणुकदारांनी गुंतवणुक केली असल्याचे तपासात आढळुन येत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संख्येत व फसवणुक झालेल्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. तरी याव्दारे ज्या गुंतवणुकदारांनी त्या योजनेमध्ये गुंतवणुक केली असल्यास त्यांनी ठाणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे,पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे व सहायक पोलीस आयुक्त अरविंद वाढणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.

 1,397 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.