नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सलग दुसऱ्या स्वच्छता अभियान

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक क्रांतीचे प्रतीक असलेल्या क्रांतीभूमीवरील स्तंभाची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली स्वच्छता

महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची देखील केली साफसफाई  

महाडमधील विरेश्वर मंदिरातील गाळ देखील ठाणे मनपा कर्मचाऱ्यांनी हटवला

महाडमधील महास्वच्छता अभियानाचा दुसरा दिवस, शहर स्वच्छतेचा घेतला आढावा

रायगड, महाड – महाडमधील महास्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या दिवशी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील सामाजिक क्रांतिचे प्रतीक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या क्रांतिभूमीवरील स्मारकाची स्वच्छता केली. त्यासोबतच महाड शहरातील मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचीही स्वच्छता करून अनोखा सामाजिक संदेश दिला. त्यासोबतच महाड शहरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पुन्हा पाहणी केली.

महाडमध्ये आलेल्या प्रलयंकारी पुराचा फटका संपूर्ण शहराला बसला, यात घरं, निवासी संकुले, व्यापारी बाजारपेठ सगळ्यांचे अतोनात नुकसान झाले. शहर स्वच्छतेसाठी २ कोटी रुपयांचा निधी श्री. शिंदे यांनी मंजूर केला आहे, असेच ठाणे, नवी मुंबई, पनवेल या महानगरपालिकांचे ४५० कर्मचारी आणि मशिनरी आणून त्यांनी या शहराच्या महास्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. काल दिवसभर महाडमध्ये फिरून स्वतः आघाडीवर राहून स्वच्छतेला सुरुवात केल्यानंतर आज पुन्हा  एकदा मैदानात उतरून  शिंदे यांनी स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला.

त्यासोबतच महाडमधील दस्तुरी चौकात असलेल्या क्रांतीभूमीला भेट देऊन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पाहणी केली. या क्रांतिभूमीवरच डॉ. आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करून सामाजिक समतेचे रणशिंग फुंकले होते. या पवित्र भूमीवर देखील पुरामुळे चिखल साचला होता तसेच या स्मारकाची रया पुरती गेली होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन भर चिखलात जाऊन ठाणे महानगरपालिकेचे फायर ब्रिगेड टँकरमधील पाणी घेऊन या स्मारकाची स्वच्छता केली. याशिवाय शहर स्वच्छ करण्यासाठी आलेल्या काही स्वयंसेवकाने हाताशी धरून स्मारक परिसरातील चिखलगाळ काढून पुतळ्यापर्यंत जाण्याच्या मार्गावर खडी टाकून रस्ता तयार करण्याचे निर्देशही दिले.

त्यानंतर त्यांनी महाड शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली वाताहत देखील पहिली. महाड शहरातील पुरात या स्मारकावर देखील चिखल बसलेला होता. त्यामुळे शिंदे यांनी या स्मारकाची देखील स्वतः फायर पंप हातात घेत स्वच्छता केली.

त्यासोबतच शहरात नदीजवळ असलेल्या विरेश्वर मंदिराचे देखील पुरात अतोनात नुकसान झाले आहे. या मंदिरात सहा फुटापर्यंत गाळ साचलेला होता. ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा गाळ साफ केल्यानंतर श्री. शिंदे यांनी या मंदिराला भेट देऊन त्याची पाहणी केली.

लोकांच्या घरातील चिखलगाळ काढण्याइतकच शहरातील स्मारके, मंदिरे ही देखील आपल्या अस्मितेची प्रतीके असल्याने त्यांची स्वच्छता होणे देखील गरजेचे आहे. याच भावनेतून आपण शहराचा मानबिंदू असलेल्या या दोन्ही स्थळांची स्वच्छता केल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 362 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.