महाड,तळीये,पोलादपूर नागरिकांची नरेश म्हस्के यांच्याकडून विचारपूस

महाड, तळीये, पोलादपूर येथील नागरिकांची महापौर नरेश म्हस्के यांनी भेट घेवून केली विचारपूस

ठाणे – एका क्षणात होत्याचे नव्हते झाले… अनेक जणांच्या कुटुंबातील माणसे दरडीखाली गाडली गेली. काही जणांना तर त्यांच्या कुटुंबियांचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही. अजूनही तळीये येथील ग्रामस्थ या दुर्देवी घटनेतून सावरलेले नाहीत. उध्वस्त झालेला संसार कसा सावरणार, पुन्हा कसे उभे राहणार असा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे. मंगळवारी (२७ जुलै) महापौर नरेश म्हस्के यांनी तळीये गावातील दुर्घटनाग्रस्त नागरिकांची भेट घेवून त्यांची विचारपूस केली.यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे व उपायुक्त अशोक बुरपल्ले उपस्थित होते.

गुरूवारी महाडमधील तळीये या ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत संपूर्ण गाव उध्वस्त झाले. या गावातील अनेक कुटुंबातील माणसे ही दरडीखाली गाडली गेली आहेत. या कुटुंबातील जे नागरिक बचावले आहे त्यांच्यासमोर राहत्या घरापासूनचे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत आहे, जखमींवर देखील उपचार सुरू आहेत. या नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी प्रत्यक्ष भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. या भेटीदरम्यान बाधित व्यक्तींचे पुनर्वसन करण्यात येईल यासाठी आपण सदैव त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही यावेळी दिली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या नागरिकांचे पुनर्वसन योग्यप्रकारे करणार असल्याचे सांगितले असून मी स्वत: यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे  महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

तळीये गावात ज्या ठिकाणी दुर्घटना घडली, त्या ठिकाणची पाहणी देखील महापौर नरेश म्हस्के यांनी केली. यावेळी तळीये गावातील ग्रामस्थ देखील उपस्थित होते. या दुर्घटनेतील बाधित नागरिकांना स्थलांतरीत करणे, शोधकार्यामध्ये सक्रीय सहभाग घेवून सर्वतोपरी मदत करणाऱ्या टीडीआरएफ, एनडीआरएफच्या जवानांचे तसेच सद्यस्थितीत ठाणेमहापालिकेच्या वतीने सेवासुविधाबाबत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे महाडकर नागरिक व महापौर या नात्याने आभार व्यक्त  केले. दुर्घटनेच्या पहिल्या दिवसापासूनच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वत: घटनास्थळी दाखल होवून संपूर्ण परिस्थ‍िती जाणून घेतली व येथील नागरिकांना आधार दिला व यापुढे देखील ते गावांच्या पुनर्वसनासाठी शासनदरबारी निश्चितच प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त करुन त्यांचे देखील आभार व्यक्त केले. तसेच या गावातील बाधित नागरिकांना विविध ठिकाणाहून मदत पाठविणाऱ्या दानशूर व्यक्तीना व संस्थांना देखील महापौर नरेश म्हस्के यांनी धन्यवाद दिले आहेत.

 325 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.