पुराच्या तडाख्यात सापडलेल्या गावांचे पंचनामे पूर्ण करून त्वरित मदत द्या

 
शहापूर तालुक्यातील पुराच्या तडाख्यात सापडलेल्या नदीकाठच्या गावांचे पंचनामे पूर्ण करून तातडीने मदत वितरित करण्याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सूचना

पूरग्रस्त गावांना भेट देऊन अन्नधान्याच्या किट्सचे केले वाटप

कसारा-सापगाव रस्त्यावरील धोकादायक पुलाच्या मजबुटीकरणासह नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीला निर्देश

शहापूर – तालुक्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदतीचे वाटप करण्याच्या सूचना नगरविकास तथा  मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा नदीपात्राजवळील काही गावांना मोठा फटका बसला होता. या भागाचा दौरा करून त्यांनी येथील परिस्थितिची पाहणी केली.  

गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या पुराचा तडाखा जसा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला तसाच तो ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याला देखील बसला, यावेळी नदीपात्राजवळ वसलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या गावाचे अतोनात नुकसान झाले. या पूरग्रस्त भागांचे पंचनामे तताडीने पूर्ण करण्यास सांगून त्याना मदत म्हणून अन्नधान्यांचे किट्सचे, सतरंज्या, चादरी, कपडे यांचे  वाटप करण्यात आले. तालुक्यातील चरिव,आल्याणी या गावांना पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी भेट दिली.

माळशेज घाटात झालेला मुसळधार पावसामुळे नद्यांची पात्र वेगाने फुगली त्यामुळे या गावातळी पाणीपातळी वेगाने वाढली त्याचा फटका या गावांना बसला, या गावांना असलेला धोका लक्षात घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत देखील शासन निश्चितच प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

यावेळी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आमदार शांताराम मोरे, माजी आमदार दौलत दरोडा, शिवसेना ठाणे ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील, शहापूर शहर प्रमुख आकाश सावंत हेही उपस्थित होते.

कसारा-सापगाव पुलाचे वेगाने पूर्ण करा

शहापूर जवळील सापगाव येथील पूल धोकादायक झाल्याने त्यावरून प्रवास करणे जीवघेणे होऊ लागले आहे. त्यामुळे या पुलाच्या मजबुतीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्यासोबतच याच जागी प्रस्तावित असलेल्या नवीन पुलाचे काम लवकरात लवकर हाती घेण्याचे निर्देश शिंदे यांनी एमएसआरडीसीला दिले. तसेच या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने, तसेच इथे झालेल्या अपघातात काही जणांना आपला जीव गमवावा लागल्याने या रस्त्याची डागडुजी तातडीने करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच या खड्ड्यासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले.

चरिव गावातील भूषण गायकरच्या कुटूंबियांचं  पालकत्व शिवसेनेने स्वीकारलं

शहापूर जिल्ह्यातील चरिव गावाजवळून वाहणाऱ्या काणवी नदीची पाणीपातळी वाढल्याने गावाजवळच्या मंदिरातील पालखी वाहून जात असताना ती बाहेर काढण्यासाठी गेलेल्या भूषण गायकर या २५ वर्षीय तरुणाचा सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या तरुणाच्या आईवडीलांचे गतवर्षी कोरोनाने निधन झाल्यानंतर कुटूंबाला हा दुसरा मोठा धक्का बसला. भूषणच्या अचानक जाण्याने आता या घरात त्याचे वृद्ध आजोबा आणि लहान बहीण एवढेच शिल्लक राहिले आहेत. आज पालकमंत्री शिंदे यांनी या कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यासोबतच तातडीची मदत म्हणून या कुटूंबाला शिवसेनेच्या वतीने ४ लाख रुपयांची मदत करण्यात आली. याशिवाय अजून ४ लाख रुपये जिल्हा आपत्ती निवारण निधीतून देण्याचे निर्देश शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यासोबतच त्याच्या धाकट्या बहिणीचे पालकत्व स्वीकारून तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेनेच्या वतीने उचलण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.

 261 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.