महाड-पोलादपूरसाठी महापालिकेची पथके रवाना

आरोग्य, घनकचरा, पाणी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी तैनात : महापालिका आयुक्तांची माहिती

ठाणे – रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर येथे पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आरोग्य, घनकचरा, पाणी विभागाचे १०० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी आज रवाना करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिली.

 राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेची विविध पथके महाडला रवाना होत आहेत. महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली स्थानिक जिल्हा प्रशासन, अतिरिक्त आयुक्त(१) व अतिरिक्त आयुक्त (२) यांच्या समन्वयाने ही पथके मदत कार्य करणार आहेत.

या विविध पथकातंर्गत आरोग्य पथक पाठविण्यात येणार असून या पथकामध्ये कोविड, साथ रोग आणि ताप सर्वेक्षणासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथके पाठविण्यात येणार आहेत. या पथकांसोबत १० हजार रॅपीड ॲंटीजन टेस्टींग कीटस्, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस टेस्टींग कीटस्, तीन डॅाक्टर्स, नर्सेस, वॅार्डबॅाय आणि मोठ्या प्रमाणात औषध साठा पाठविण्यात येणार आहे.

साफसफाई, फवारणीसाठी सफाई कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, फायलेरिया कर्मचारी तसेच त्यांच्यासोबत २४ पंप, ४ स्प्रेईंग मशीन, ४ फॅागिंग मशीन, सोडियम हायपोक्लाराईड व फवारणीसाठी लागणारे सर्व रसायणे आदीसह सुसज्ज ९० कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात येत आहे.

तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १० हजार लिटर्स पाण्याचा एक टॅंकर आणि स्वच्छतेसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा १० हजार लिटर्स क्षमतेचा एक टॅंकर असे एकूण दोन टॅंकर पाठविण्यात येत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याचे दोन ट्रक, रेशनिंग, किटस्, ५ हजार सतरंजीही पाठविण्यात येणार आहेत.

मृत जनावरांचे पंचनामे करून त्यांची तातडीने विल्हेवाट लावता यावी यासाठी महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीमही रवाना होत असून या सर्व पथकांसोबत महापालिकेच्या ८ ते ९ मिनी बसेस, दोन डंपर, २ ट्रक, ४ जीप आणि इतर साहित्य पाठविण्यात येणार आहे.

दरम्यान पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेच्या टीडीआरएफ जवानांचे एक पथक पहिल्या दिवसांपासून मदत कार्यात गुंतले असून खुद्द पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के हे दोन दिवस महाड येथे तळ ठोकून मदत कार्यावर लक्ष ठेवून होते.

महापालिकेची ही विविध पथके उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आणि आगार व्यवस्थापक दिलीप कानडे यांच्या अधिपत्याखाली रवाना होणार असून ही पथके स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने मदत कार्य करणार आहेत. 

 298 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.