विक्रमगड कोविड सेंटरमधील जेवणात सलग दोन दिवस अळ्या

रुग्णांची तक्रार आमदार निरंजन डावखरे यांची कारवाईची मागणी

ठाणे  –  जिल्ह्यातील विक्रमगड येथील रिवेरा कोविड सेंटरमध्ये सलग दोन दिवस रुग्णांना पुरविण्यात आलेल्या चिकनच्या भाजीमध्ये अळ्या आढळल्या आहेत. या धक्कादायक प्रकाराबाबत रुग्णांनी तक्रारी केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने शिवसेनेच्या नावाने धमक्या दिल्या असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान, या प्रकरणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे व जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी जिल्हाधिकारी माणिकराव गुरसळ यांच्याकडे चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विक्रमगड, जव्हार, वाडा आणि पालघर तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाने विक्रमगड नजीकच्या हातणे येथे रिवेरा कोविड सेंटर सुरू केले होते. या सेंटरमध्ये गरीब रुग्णांवर दर्जेदार उपचाराची अपेक्षा होती. मात्र, या सेंटरमध्ये सुविधा नसल्याबाबत सातत्याने तक्रारी आहेत. या सेंटरमधील रुग्णांना रविवारी डाएट प्लानमध्ये चिकनची भाजी देण्यात आली होती. मात्र, त्यात अळ्या होत्या. यापूर्वीही असाच प्रकार झाला होता. त्यामुळे संतप्त रुग्णांनी प्रशासनाकडे तक्रारी केली. तसेच भोजन पुरविणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी संबंधित ठेकेदाराने शिवसेनेच्या नावाने रुग्णांनाच धमक्या दिल्या.

या गंभीर प्रकाराबाबत भाजपाचे आमदार निरंजन डावखरे व जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी जिल्हाधिकारी माणिकराव गुरसळ यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच कोविड सेंटरमध्ये दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.

 285 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.