‘जून’ अखेर ३० जूनपासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ वर

मनाची मरगळ दूर करणारा ‘जून’ ३० जूनपासून  ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ वर

मुंबई – एखाद्या जखमेवर कोणी हळुवार फुंकर मारली, तर ती जखम भरून येण्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. अशीच हळुवार फुंकर कोणी आपल्या मनाच्या जखमेवर मारली तर? त्यावेळी आपल्या मनात  ‘हिलींग इज ब्युटीफुल’ अशीच भावना येईल. सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती दिग्दर्शित ‘जून’ हा चित्रपट ३० जून रोजी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’,’अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनी’वर प्रदर्शित होत आहे. जून महिन्यात पावसाळयाच्या आगमनाने जसा निसर्ग बहरतो, तशीच मनाची मरगळही दूर करण्याचा प्रयत्न ‘जून’ मध्ये करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. नेहा आणि सिद्धार्थची एक वेगळीच केमिस्ट्री यात पाहायला मिळाली. यावरून ‘जून’ मध्ये प्रेक्षकांना त्यांची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे की,  मैत्रीच्या पलीकडचं नातं?

सुप्री मीडियाचे शार्दुल सिंग बायस, नेहा पेंडसे-बायस आणि ब्लू-ड्रॉप प्रा. लि. चे निखिल महाजन आणि पवन मालू निर्मित या चित्रपटात नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जितेंद्र जोशी, निखिल महाजन यांचे शब्द लाभलेल्या या चित्रपटातील गाण्यांना शाल्मलीने संगीतबद्ध केले आहे.

आपल्या भूमिकेबद्दल आणि एकमेकांसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल निर्माती, अभिनेत्री नेहा पेंडसे – बायस आणि  सिद्धार्थ मेनन सांगतात, ”भूमिकेबद्दल सांगण्यापेक्षा आम्ही एक सांगू, हा प्रत्येक व्यतिरेखेचा प्रवास आहे. प्रत्येक जण कशाच्या तरी शोधात आहे. प्रत्येकाचे आयुष्याशी निगडीत काही प्रश्न आहेत. आयुष्य बदलण्यासाठीची प्रत्येकाची धडपड आहे. त्यामुळे साचेबद्ध अशी कोणाची भूमिका नाही. एक नक्की यातील प्रत्येक व्यक्तिरेखा काहीतरी सकारात्मक विचार देऊन जाणारी आहे आणि एकमेकांसोबत काम करण्याचा अनुभव सांगायचा झाला तर आम्ही दोघंही एकमेकांना कधीच भेटलो नव्हतो. ‘जून’ मधील नेहा आणि नीलची जशी हळूहळू ओळख होत गेली. तशीच नेहा आणि सिद्धार्थचीही शूटदरम्यान ओळख होत गेली. त्यामुळे आमचा हा प्रवास खूपच छान झाला.”

‘जून’बद्दल ‘प्लँनेट मराठी ओटीटी’चे सीएमडी अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” प्रादेशिक भाषेमध्ये अनेक वेगवेगळे विषय हाताळले जातात. असाच एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न ‘जून’मध्ये करण्यात आला आहे. जो नेहमीपेक्षा वेगळा आहे आणि म्हणूनच ‘जून ‘ची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही घेण्यात आली आहे. ‘जून’ मधून प्रेक्षकांना नक्कीच एक सकारत्मक दृष्टीकोन मिळेल.”

 2,437 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.