आरक्षणसाठी सर्व मराठा समाज एकत्र आला तर दलित समाज ही त्यांच्या पाठीशी उभा राहील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई – ग्रामीण भागातून मी आलो असल्याने गावात मराठा समाजाची सत्यस्थिती काय आहे ती मला माहित आहे. मराठा समाजात गरिबांची संख्या मोठी आहे.  सर्व मराठा समाजाला नाही मात्र गरीब मराठ्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे.त्यामुळे सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण देण्याची मी मागणी केली होती.मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. महाविकास आघाडी सरकार ने सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू नीट मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गेले. आरक्षणासाठी च्या लढ्याला  सर्व  मराठा समाज एकत्र आला तर दलित समाज सर्व ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले.
नवी मुंबईतील माथाडी भवन हॉल मध्ये राज्य व्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामदास आठवले बोलत होते. यावेळी  अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री नारायण राणे ,विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड,आ नरेंद्र पाटील,आ.रमेश पाटील,सुरेश पाटील,रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष पनवेल चे उपमहापौर जगदीश गायकवाड,  सिद्राम ओव्हाळ, यशपाल ओव्हाळ; सचिन कटारे,आदी मान्यवर उपस्थित होते. या गोलमेज परिषदेस राज्यभरातील मराठा समाजाच्या ४२ संघटना सहभागी झाल्या होत्या.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर नुकताच मांडला आहे. मराठा समाजा प्रमाणे देशभरातील मराठा जाट रेड्डी आदी क्षत्रिय समाजाला १२ टक्के आरक्षण दिले पाहिजे या मागणीचा विचार करण्याची सूचना केली आहे. दलित अदिवासी ओबीसी कुणाच्या ही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची चांगली मागणी  मराठा समाजातून होत आहे. त्यांच्या मागणी ला दलित समाजाचा ही पाठिंबा आहे. मराठा समाजात काही प्रमाणात श्रीमंत मराठा समाज असला तरी गरीब मराठा बहुसंख्य असून मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. ओबीसींप्रमाणे ज्यांचे उत्पन्न ८ लाखांच्या आत आहे अशा मराठा समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण द्या. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटील यांनी सर्वप्रथम मोठे योगदान दिले आहे त्यांची आठवण ठेवण्याचे आवाहन यावेळी ना.रामदास आठवले यांनी केले.

या गोलमेज परिषदेत ना रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आपल्या खास शैलीत सादर केलेली  बहारदार कविता आकर्षण ठरली. नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात नंबर लागणार आहे त्यांचा नंबर लागला तर माझा ही केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदी नंबर लागेल असे ना रामदास आठवले म्हणाले.

मराठा समाजाचे  खणखणीत नाणे
त्यांचे नाव आहे नारायण राणे
महाविकास आघाडी चे काम आहे फक्त खाणे
आमचे काम आहे मराठा आरक्षणाचे गीत गाणे

मी लढा देणार आहे मराठा आरक्षणासाठी
कारण मी आहे जातिवंत घाटी
हातात घेऊन काठी
मी तुमच्यासाठी लागणार आहे उद्धव ठाकरेंच्या पाठी

मराठा समाजाला मिळत नाही आरक्षण
कारण उद्धव ठाकरेंचे ठीक नाही लक्षण
आम्हाला करायचे आहे मराठा समाजाचे रक्षण
एकदिवस करून टाकू आम्ही आघाडी सरकारचे भक्षण

जर एकत्र आले मराठा आणि दलित  
तर जरूर मिळेल मराठा समाजाला फलित.
मराठा समाज जर झाला जागा
तर उध्वस्त करून टाकतील उद्धव ठाकरेंच्या बागा

मराठा आरक्षणाचा जर कोणी तोडला धागा तर त्याला घरी जाऊन डागा !

रामदास आठवले यांनी सादर केलेल्या या कवितेला  उपस्थितांनी प्रचंड टाळ्या वाजवून दाद दिली. 

 300 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.