आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही – उद्धव ठाकरे


मुंबई – आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही. शिवसेनेचा जन्म न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झाला आहे. आम्ही भलत्यासलत्याच्या पालख्यांना खांदा देणार नाही. त्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही. पायात फाटके जोडे घालू, पण आम्ही आमच्याच पायांवर खंबीरपणे उभे राहू”,  असे मत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिना निमित्त उद्धव ठाकरे यांनी सोशल मिडीयाद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. मुंबई येथील दादर भागातील शिवसेना भवन येथे दोन दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी हाणामारी झाली . या हाणामारीनंतर भाजपनं सेनेवर सडकून टीका केली होती. या घटनेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन दिवसांपासून शिवसेनाप्रमुखांचे एक भाषण व्हायरल होत आहे. ते का होत आहे, हे आपल्याला माहिती आहे. याला शिवसैनिक म्हणतात. नुसत्या हाणामाऱ्या करणं हे आपलं काम नाही. रक्तपात करणं हा आपला गुणधर्म नाही. अन्यायावर वार करणारा शिवसैनिक आहे. पण रक्तपाताची ओळख मुद्दामून कोणी करुन देत असेल, तर रक्तदान करणाऱ्या शिवसैनिकाची ओळख अनेकांना आहे, असे त्यांनी सांगितले. 1992-93 च्या दंगलीत शिवसैनिक रस्त्यावर उतरला नसता तर मुंबई वाचली नसती. ही सुद्धा शिवसेनेची ओळख. ज्या ज्या वेळी रक्तदान करण्याची वेळ येते, त्यावेळी शिवसैनिक सर्वात आधी पुढे येतो. हे आमचं हिंदुत्व आहे, आमचं रक्तदान सर्वधर्मीयांसाठी आहे”, असेही ते म्हणाले.

बंगालने स्वबळाचा खरा अर्थ दाखवून दिला. ममतांनी बंगालची ताकद दाखवून दिली. राजकारण आता वळत चाललं आहे. राजकारणाची उंची काय आहे, हे सगळ्यांना कळतं आहे. राजकारणात जे चाललं आहे ते दिसतंय. राजकारणाचं विकृतीकरण सुरु आहे. अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद दाखवलीच पाहिजे. आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवाच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचा उल्लेख टाळत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत मराठी माणसाला किंमत नव्हती. त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असे. परंतु बाळा साहेबांनी अंगार फुलवला आणि मराठी माणसाला स्वाभिमान आणि बळ दिले. स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं. तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा. माझ्यासाठी स्वबळ हे आहे. निवडणुका तर होत असतात. जिंकण हरणं होत असतं. पण हरल्यानंतर पराभूत मानसिकता जास्त धोकादायक आहे, असेही ते म्हणाले. हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे. मग आमची प्रादेशिक अस्मिता आहे. एक देश अनेक भाषा हे जगाच्या पाठीवरच एकमेव उदाहरण आहे. संकट काळात शिवसेना मदतीसाठी सरसावते,असेही ते म्हणाले.

 450 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.