व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर काढून टाकलेले ग्लोबलचे कर्मचारी अखेर पुन्हा कामावर

भाजपाने उठविला आवाज

ठाणे – ग्लोबल कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत ५० डॉक्टर व २०२ नर्स यांच्यासह वॉर्डबॉयला व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे कामावरून काढून टाकण्यात आले होते. मात्र, या प्रकरणात भाजपाने आवाज उठविल्यावर कंत्राटदाराने नमते घेऊन पुन्हा सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेतले. दरम्यान, ग्लोबल कोविड हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचे कंत्राट घेतलेल्या मे. ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. कंपनीच्या ढिसाळ कारभाराबद्दल कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली आहे.

ठाणे महापालिकेने स्थापन केलेल्या बाळकूम येथील ग्लोबल कोविड हॉस्पिटल व माजिवडा येथील पार्किंग प्लाझातील रुग्ण व्यवस्थापनाचे कंत्राट मे. ओम साई आरोग्य केअर कंपनीला देण्यात आले आहे. मात्र, या कंपनीकडून अनेक गैरप्रकार केले जात आहेत. सुमारे महिनाभरापूर्वी डॉक्टरांची सेवा खंडित करण्याचा, तर नर्सचे पगार रखडण्याचा प्रकार घडला होता. त्याचप्रमाणे काल मध्यरात्री ग्लोबल कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रूपवर कंत्राटदाराकडून मेसेज टाकण्यात आला. त्यात ५० डॉक्टर, २०२ नर्स यांच्यासह वॉर्डबॉयला सेवेतून काढून टाकण्यात आले होते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात करण्यात आली होती. या प्रकाराचे तीव्र पडसाद कर्मचाऱ्यांमध्ये उमटले. वॉर्डबॉयने कामावर जाण्यास नकार दिला. तर काढून टाकलेल्या डॉक्टर व नर्स यांच्याकडून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. आपल्यावरील अन्यायाची माहिती कर्मचाऱ्यांकडून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या व आमदार निरंजन डावखरे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने धाव घेऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर महापालिकेच्या आयुक्तांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. काही वेळानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अनिरुद्ध माळगावकर, कंत्राटदाराचे प्रतिनिधी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यात सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा भाजपाच्या नेत्यांनी आग्रह धरला. अखेर कंत्राटदाराने नमते घेत सर्व कर्मचाऱ्यांना तात्पुरते कामावर ठेवण्यास सहमती दर्शविली.

यादीतील अनेक कर्मचारी कामावरच नाहीत – निरंजन डावखरे

मे. ओम साई आरोग्य केअर कंपनीच्या कंत्राटदाराकडून महापालिकेची फसवणूक केली जात आहे. संबंधित कंत्राटदाराने यापूर्वी दिलेल्या यादीतील २०२ पैकी ९७ कर्मचारी कामावरच हजर नव्हते. नव्या कर्मचारी यादीतील ३० हून अधिक कर्मचारी हॉस्पिटलमध्ये सेवेत नाहीत. त्यामुळे महापालिकेची आर्थिक लूट होत आहे. यापूर्वी दीड लाख रुपयांमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना व्हेंटिलेटर बेड देणे, पार्किंग प्लाझामधील रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री, लसीकरणातील घोळ आदी प्रकार घडले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाकडून ओम साई आरोग्य केअरला संरक्षण दिले जात आहे, या कंपनीवर वरदहस्त कोणाचा, त्यांच्यावर कारवाई करण्यास महापालिका का घाबरत आहे. केळकर समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्याऐवजी नव्या समितीची स्थापना करून कंत्राटदाराला क्लिन चिट देण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी चर्चा नागरीकांमध्ये सुरू आहे. अशा परिस्थितीत ओम साई कंपनीवर कडक कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली.

 532 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.