कोपरी गावातील बेघरांसाठीचे निवारा केंद्र अखेर हद्दपार

भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी ठामपा प्रशासनाचा डाव हाणुन पाडला  

ठाणे – ठाणे पुर्वेकडील कोपरी गावातील मनपा शाळा क्रमांक १६ मध्ये शहरी बेघरांसाठी उभारण्यात येत असलेले निवारा केंद्र अखेर हद्दपार करण्यात भाजपचे स्थानिक नगसेवक भरत चव्हाण यांना यश आले आहे.कोपरी गावातील या शाळेशेजारी प्राचीन मंदिर असुन याठिकाणी आबालवृद्धासह लोकवस्तीची नियमित वर्दळ असते.तरीही,ठाणे महापालिका प्रशासनाने याठिकाणी बेघरांसाठी निवारा केंद्राचा घाट घातल्याचा घणाघाती आरोप नगरसेवक भरत चव्हाण यांनी शुक्रवारच्या (दि.१८ जून) सर्वसाधारण सभेत करून प्रशासनाचे वाभाडे काढले.अखेर,महापौर नरेश म्हस्के यांनी, प्रशासनाला धारेवर धरून हा प्रस्तावच दफ्तरी दाखल करण्याचे आदेश दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातर्गत ठाणे मनपा क्षेत्रात बेघरांसाठी १८ रात्र निवारे उभारण्यात येत आहेत. सदयस्थितीत नौपाडा प्रभागात ५० व्यक्तीकरिता निवारा केंद्र कार्यरत असुन सन २०२० – २१ या आर्थिक वर्षात एक निवारा केंद्र उभारण्याचे उद्दीष्ट असल्याने समाजविकास विभागाने कोपरी गावातील महापालिका शाळा क्रमांक १६ येथील जागा निश्चित केली होती.ही जागा शिक्षण विभागाकडुन ताब्यात घेऊन बेघरासाठी निवारा केंद्र उभारण्यासाठीचा प्रस्ताव समाजविकास विभागाच्या उपायुक्त वर्षा दिक्षीत यांनी सर्वसाधारण सभेसमोर मांडला.त्यावर,स्थानिक भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी जोरदार आक्षेप नोंदवला.अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी तरी केली का ? हा परिसर रहिवाशीबहुल असुन स्थानिक लोकप्रतिनिधीना न कळवता कोपरी गावातील या शाळेत बेघरांना जागा कशी काय दिली जाते ? असा सवाल करीत भरत चव्हाण यांनी,या शाळेशेजारीच मंदिर असुन,आजूबाजूला जेष्ठ नागरिक तसेच लहान मुलांचा वावर असतो.

 बेघरामध्ये गर्दुल्ले,तसेच अनेक अपप्रवृत्ती असल्याने याठिकाणी बेघरांचे वास्तव्य राहिल्यास परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या मुद्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच,हे निवारा केंद्र त्वरित अन्यत्र हलवण्याची मागणी केली.नगरसेवक भरत चव्हाण यांच्या या मागणीला सभागृहानेही पाठींबा दर्शवल्याने अखेर,महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.लोकप्रतिनिधीना न सांगता शाळेमध्ये  बेघरांना निवारा केंद्र कसे दिले,पालिका अधिकऱ्यांनी यासाठी कोणते निकष लावले आहेत.असा समाचार घेत हे चुकीचे असून हे निवारा केंद्र त्वरित त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे निर्देश देऊन संबंधित प्रस्तावच दप्तरी दाखल करण्याचे आदेश दिले.

अन्यथा रोषास सामोरे जा – भरत चव्हाण

 कोपरी परिसरात आधीच हाताच्या बोटावर मोजता येतील,इतक्याच महापालिकेच्या शाळा उरल्या आहेत.त्यामुळे अनेक गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित आहेत. शिवाय,कोपरी परिसर १०० टक्के निवासी क्षेत्र असल्याने निवारा केंद्रातील भिकारी, गर्दुल्यांचा इथल्या रहिवाश्यांना त्रास होणार आहे.तेव्हा,ठाणे मनपा प्रशासनाने कोपरीवासियाच्या त्रासात भर घालण्याचे काम करू नये.अन्यथा,प्रचंड रोषास सामोरे जावे लागेल.असा इशाराही नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिला आहे.

 348 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.