भिवंडी गट शिक्षणाधिका-यांच्या कन्येचा जि.प. वैजोळा शाळेत प्रवेश

आदर्शवत कृतीमुळे सर्वच स्तरातून कौतुक

ठाणे – मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांचे रुपडे पालटले आहे. शाळा डिजिटल झाल्या असून गुणवत्तापूर्ण वातावरणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे  सर्वच स्तरातून पालक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेताना दिसत असताना नुकतेच  भिवंडी तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी निलम पाटील यांनी मुलगी अदिती हिचा पहिलीचा प्रवेश  जि.प.शाळा वैजोळा येथे घेतला आहे. पाटील  उभयतांनी केलेल्या या आदर्शकृतीमुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

पाटील या ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात, भिवंडी तालुक्यात गट शिक्षणाधिकारी या महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. सध्या त्या बापगाव येथे वास्तवास आहेत. त्यामुळे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कल्याण व भिवंडी शहरातील इंटरनॅशनल स्कूल व खाजगी शाळेत मुलीला न पाठवता जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतूक होत आहे. या प्रवेशाप्रसंगी शिवनगर केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील पाटील  उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळा वैजोळा ही ज्ञानरचनावादी शाळां असून येथे शिक्षक रमेश म्हसकर आणि अर्चना पाटील  कार्यरत आहेत. अपार मेहनत घेऊन मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहीला आहे.  मातृभाषेतूनच मुलांना शिक्षण द्यायला हवे, हे केवळ न बोलता कृतीतून दाखवून देण्याची आम्हाला संधी मिळाली असे पाटील यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा या गुणवत्तापूर्ण आहेत, प्रचंड मेहतीने स्पर्धात्मक जगात वावरण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत आहेत , त्यामुळे पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन  पाटील यांनी केले आहे.

 312 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.