ठाणे जिल्हा रुग्णालयाचा सुधारित आराखडा शासनाला सादर करा

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा सुधारित आराखडा त्वरित मंजूर करून शासनाला सादर करा

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आरोग्य विभागाला सूचना

मुंबई – ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा सुधारीत आराखडा त्वरित मंजूर करून शासनाला सादर करण्याचे निर्देश नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा आढावा घेण्याबाबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

ठाणे जिल्हा रुग्णालयाचा पुनर्विकासाचा प्रश्न गेले काही वर्षांपासून प्रलंबित आहे. या रुग्णालयाच्या जागी सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे करण्यासाठी शिंदे गेली काही वर्षे प्रयत्नशील आहेत. नवीन पुनर्विकास प्रस्तावानुसार या रुग्णालयाची क्षमता 550 बेडसवरून वाढून 900 बेडस इतकी होणार आहे. तसेच, रुग्णालयाच्या इमारतीसोबतच नर्सिंग इमारतही प्रस्तावित आहे.
सुधारित आराखड्यानुसार अंदाजे खर्च ३१४ कोटीवरून ५२७ कोटींपर्यंत वाढला आहे.
पुनर्विकासाचा सुधारित आराखडा आरोग्य विभागाला सादर झाला असून तो लवकरात लवकर मंजूर करण्याची सूचना शिंदे यांनी या बैठकीत आरोग्य विभागाला केली. तसेच, या सुधारित आराखड्यानुसार किंमत वाढत असल्याने त्यासाठी राज्य शासनाकडून सुधारित वित्तीय मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची  सूचना देखील शिंदे यांनी केली.

ठाणे जिल्हा रुग्णालयाची इमारत जुनी आणि जीर्ण झाली असल्याने तिचा पुनर्विकास वेगाने करण्याची गरज आहे. तसेच, केवळ ठाणेच नव्हे, तर लगतच्या जिल्ह्यातील रुग्णांसाठीही हे रुग्णालय आधारस्तंभ आहे, असे  शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे या सुधारित प्रस्तावाला त्वरित मान्यता देण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी आरोग्य सचिवांना केली.

या बैठकीला आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास पवार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

 316 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.