महापौर आणि आयुक्तांनी घेतला कोविड वॉर रूम कामकाजाचा आढावा
ठाणे – ठाणे शहरात कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा न करता उपलब्ध असणारी कोविड हॉस्पिटल्स, बेड व्यवस्थेसह रुग्णवाहिका तसेच इतर मुलभूत माहिती तात्काळ देण्यासाठी कोविड वॉर रूममध्ये मनुष्यबळ व संपर्क क्रमांक वाढवून ती अधिक सक्षम करण्यात आली असून आज महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी भेट देवून संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविड वॉर रूमने अधिक प्रभावीपणे काम केले आहे. कोविड वॉर रूम अधिक सक्षम करण्यासाठी नवीन हेल्पलाईन संपर्क क्रमांक वाढविण्यासोबतच मनुष्यबळ वाढविण्याचे आदेश डॉ. विपिन शर्मा यांनी यापूर्वीच दिले होते. त्यापार्श्वभूमीवर वॅाररूममधील 20 सर्वच संपर्क क्रमांक एकाच क्रमांकाने जोडण्यात आले आहेत.
यामध्ये आणखी मनुष्यबळ वाढवून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड वॉर रूम सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित विभागास दिले. त्यामुळे नागरिकांना आता संपर्क क्रमांक बिझी असल्यामुळे कोणतीही प्रतीक्षा न करता तात्काळ संपर्क साधून उपलब्ध माहिती घेता येणार आहे.
यावेळी कोविड वॉर रूममधील संपर्क +९१ ७३०६३ ३०३३० सुरळीपणे चालू आहे याबाबत महापौर आणि आयुक्तांनी स्वतः खातरजमा करुन घेतली. तसेच कोविड वॉरमध्ये संपर्क साधल्यास कशा पद्धतीने नागरिकांना प्रतिसाद दिला जातो याचीही खातरजमा केली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका सक्षम असल्याबाबत महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
शहरातील उपलब्ध जवळचे रुग्णालय, उपलब्ध बेड्स, तसेच अत्यावश्यक रुग्णवाहिका आदी माहिती तात्काळ मिळण्यासाठी नागरिकांनी +९१ ७३०६३ ३०३३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.
यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, कार्यकारी अभियंता भरत भिवापूरकर, रामदास शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी आदी उपस्थित होते.
474 total views, 1 views today