नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे

ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी मानवी साखळी आंदोलन

ठाणे – नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई राष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.  
यासंबंधी माहिती देताना दशरथ पाटील  यांनी सांगितले की, लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आलेली आहे. तरी देखील अचानकपणे 17 एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी ओबीसी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हे सारे प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक व राजकीय संघटना मानवी साखळी आंदोलनात सहभागी होणार आहेत. सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र इशारा त्यांनी यावेळी दिला.  
आपल्या बुलंद आवाजाने महाराष्ट्र विधीमंडळात तसेच खासदार म्हणून संसदेत शेतकऱयांचे, कष्टकऱयांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले. ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा प्रश्न अशा अनेक आंदोलनांत भाग घेऊन त्यांनी तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य नव्या पिढीला स्फूर्तिदायी ठरावे यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागरूक रहावी यासाठी नवी मुंबईत विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
ठाणे शहरात गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जेल, पोलिस लाइन, कळवा पूल, शिवाजी चौक, विटावा अशी मानवी साखळी करणार आहेत.

 287 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.