नातवंडानी अन्नदानाने साजरा केला आजीचा वाढदिवस

 सौरभ मित्र मंडळ करणार अन्नदानाने वाढदिवस साजरे 

 “तुम्ही करा अन्नाचं दान, आम्ही वाढवू तुमचा आत्मसन्मान” सौरभचा नवा उपक्रम

मुंबई :  अकाली मृत्यूने देवाघरी गेलेल्या आपल्या लाडक्या आजीला आजही आपल्यातच असल्याचं मानणाऱ्या नात पूर्वी दिसले, स्पृहा दिसले आणि सावी जगताप यांनी सौरभ मित्र मंडळाच्या उपक्रमात अन्नदान करीत अनोख्या पद्धतीने आपल्या आजीचा जन्मदिन साजरा केला. आजी आणि नातींमधलं जिव्हाळ्याचं नातं दाखविणाऱ्या या घटनेमुळे लॉकडाऊनदरम्यान गरीब, गरजू आणि भुकेल्यांना अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सौरभ मित्र मंडळाच्या या सत्कार्याला ‘जन्मदिनाचं संकल्प” असं अनोखं स्वरूप प्राप्त झालं आहे.
सौरभच्या नव्या सत्कार्यामुळे अनेक अन्नदात्यांनी आपले जन्मदिन अन्नदानाने साजरे करण्याचे जाहीर केले असून सौरभच्या अन्नदानाच्या उपक्रमाला आणखी बळकटी लाभलीय. सोबतीला मंडळानेही “तुम्ही करा अन्नाचं दान, आम्ही वाढवू तुमचा आत्मसन्मान” असा नवा उपक्रम सुरू केला आहे.
 गेल्या ऑक्टोबर महिन्यात छाया सोपान जगताप यांच्या अकाली निधनामुळे समस्त जगताप कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. आजही त्यांची मुलं आणि नातवंडं ते गेल्याचं सत्य मानत नाहीत. आपली आजी अजूनही रूग्णालयात उपचार घेतेय आणि ती लवकरच बरी होऊन घरी परतेल, असंच त्यांच्या नातवंडांना आजही वाटतंय. त्यामुळे आपल्या आजीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरे करण्याचे नातवंडांनी ठरवले. त्याचदरम्यान सौरभ मित्र मंडळाच्या माध्यमातून मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात अन्नदानाचे सत्कार्य पार पाडले जात होते. गरीब आणि गरजूंच्या मुखी अन्नाचे दोन घास लागावेत म्हणून सौरभ मित्र मंडळ घेत असलेले परिश्रम पाहून ही जगतापांची नातवंडं भारावली आणि त्यांनी मंडळाचे सदस्य संजय सोमनाथ शेटये यांच्याशी संपर्क साधला. त्या म्हणाल्या, आम्हाला आमच्या आजीचा वाढदिवस अन्नदान करून साजरा करायचा आहे. नातवंडांची ही भावना ऐकून सौरभ मित्र मंडळही आनंदित झाले आणि त्यांनी उपक्रमाचे स्वागत केले. नातवंडांच्या इच्छेनूसार सौरभने आज २२५ लोकांना अन्नदानाचे सत्कार्य करून आपली माणसातली माणुसकी जपण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.
शेटयेंचे सून आणि सासरेही साजरे करणार अन्नदानाने वाढदिवस
सौरभच्या अन्नदानाच्या उपक्रमाला जन्मदिनाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे कळताच नीला संजय शेटये आणि सोमनाथ गोविंद शेटये हे सून आणि सासरे आपला वाढदिवस गरीबांना अन्नदान करून करणार आहेत. जन्मदिनाला केक कापून वाढदिवस साजरा करण्याऐवजी त्याच खर्चातून गरीबांच्या मुखी दोन घास लागावेत, याच भावनेने आपण गरीबांना अन्नदान करीत असल्याचे नीला शेटये म्हणाल्या. जन्मदिन हा अन्नदानानेही साजरा होऊ शकतो, ही कल्पना मला खूप आवडली म्हणून मीसुद्धा माझा वाढदिवस याच पद्धतीने करीत असल्याचे सोमनाथ शेटये यांनी सांगितले.
प्रत्येकाने करावा अन्नदानाने वाढदिवस साजरा
गेली ३५ वर्षे सामाजिक बांधिलकी जपणारे सौरभ मित्र मंडळही आपले जन्मदिनी अन्नदान हा उपक्रमही माणुसकीच्या भावनेतूनच आयोजित करीत आहे. माणुसकीची जाण आणि गरीबांविषयी आपुलकी असणाऱ्या सर्वच लोकांनी आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण अन्नदान करून साजरा करावा, ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी म्हणून ‘तुम्ही करा अन्नाचं दान, आम्ही वाढवू तुमचा आत्मसन्मान” हा जन्मदिनी अन्नदानाचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. या उपक्रमालाही मोठ्या प्रमाणात अन्नदात्यांचा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मंडळाचे सरचिटणीस मंगेश वरवडेकर यांनी व्यक्त केला आहे.
 

 246 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.