लस सहज उपलब्ध झाल्याबद्दल महापौर नरेश म्हस्के यांचे नागरिकांनी मानले आभार
मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कोपरीतील कुष्ठरुग्ण वसाहतीतील नागरिकांचे लसीकरण
ठाणे – कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण ठाणे शहरात नियोजनबद्धरित्या सुरू असून शेवटच्या नागरिकांपर्यत लस पोहचावी, किंबहुना कोणताही नागरिक लसीपासून वंचित राहू नये यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या माध्यमातून फिरते लसीकरण केंद्र (मोबाईल व्हॅन) सुरू करण्यात आले. आज प्रथमच कोपरी येथील महात्मा गांधी कुष्ठरुग्ण् वसाहतीतील नागरिकांना या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून लसीकरण करण्यात आले, या लसीकरणास तेथील नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.
महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत कोपरी येथील महात्मा गांधी कुष्ठरुग्ण वसाहतीत फिरत्या लसीकरण केंद्राच्या माध्यमातून आज लसीकरणास सुरूवात करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी, शाखाप्रमुख महादेव पवार, विजय पाटील, उपशाखाप्रमुख प्रभाकर मेहेत्रे, कांती नाईक, गांधीनगर पंचायत समितीचे सदस्य, आशावर्कर्स उपस्थित होत्या.
ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जावून लस घेणे जिकरीचे होत असल्याने अनेक नागरिक यापासून वंचित राहत होते. तसेच काही नागरिकांकडे ओळखपत्र उपलब्ध नसल्यामुळे लसीकरणामध्ये बाधा निर्माण होत होती. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लस हे एकमेव माध्यम असल्यामुळे सर्व नागरिकांचे लसीकरण होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी महत्वाकांक्षी निर्णय घेवून अशा नागरिकांपर्यत जावून लसीकरण करावे असा प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला व यास महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मान्यता देवून मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली. आज या मोहिमेअंतर्गत कोपरी येथील महात्मा गांधी कुष्ठरुग्ण वसाहतीमध्ये 60 वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्यात आले तसेच कुष्ठरुग्णांना विशेष दिव्यांग म्हणून मान्यता असल्याने येथील 45 वर्षावरील नागरिकांना सुध्दा लस देण्यात आली. या रुग्णांना घराबाहेर पडणे शक्य नसल्याने आपल्या निवासाच्या ठिकाणी लस सहज उपलब्ध होत असल्यामुळे या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी महापौर नरेश म्हस्के व महापालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले. ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबवून सर्व विभागातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण झाल्यास निश्चितच आपण कोरोनावर अधिक जलदगतीने मात करु शकू असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी व्यक्त केला.
महापालिकेच्या वतीने राबविण्यात गेलेल्या या लसीकरण मोहिमेमध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, विशेष व्यक्तींनी सहभागी व्हावे तर काही व्याधींनी अंथरुणावर असलेल्या व्यक्तींचे त्यांच्या नातेवाईकांनी लसीकरण करुन घ्यावे असेही आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी केले. महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये नेहमीच आशा वर्कर्सचा सक्रिय सहभाग असतो, त्याबद्दल महापौरांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
396 total views, 2 views today