सभागृहातील महासभेचा मार्ग मोकळा होणार


शरद पवार संबधितांशी चर्चा करणार

शानू पठाण आणि हणमंत जगदाळे यांनी घेतली पवारांची भेट

पालकमंत्री अन् गृहनिर्माण मंत्र्यांचीही भेट घेणार

ठाणे – आयत्या वेळेच्या ठरावांसह चुकीच्या पद्धतीने ठाणे महानगर पालिकेची सभा होत आहे. या बाबत आपण संबधितांशी चर्चा करुन प्रत्यक्ष महासभा होण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण आणि ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांना दिले.
ठाणे महानगर पालिकेत प्रत्यक्ष महासभा होत नसल्याने अनेक चुकीच्य गोष्टींचा पायंडा पाडला जात आहे. या संदर्भात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या सुचनेवरुन तसेच शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण आणि ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महापालिकेतील कारभाराबाबत अनेक मुद्दे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.
 गेली अनेक वर्षे सभागृहाचे जे कामकाज संख्याबळावर कामकाज करुन त्यामध्ये नगरसेवकांवर अन्याय केला जात आहे. अनेक महत्वाचे विषय टाळले जात आहेत. जनतेच्या हितापेक्षा स्व हिताच्या विषयांवर अधिक भाष्य करण्यात येत आहे. किंबहुना असेच ठराव मंजूर करण्यात येत आहेत. कोविडच्या काळात ऑनलाईन सभा घेतली जात असली तरी त्यामध्ये अनेक नगरसेवकांना बोलू दिले जात नाही. त्यांचे आवाज म्यूट करुन जनतेचे प्रश्न मांडणार्‍या नगरसेवकांची मुस्कटदाबी केली  जात आहे. अनेकदा तर आयत्या वेळच्या विषयांच्या नावाखाली अनावश्यक विषयांना मंजुरी देण्यात येत असते. त्याचा गोषवाराही नगरसेवकांपर्यंत पोहचलेला नसतो. अर्थसंकल्पाच्या बाबतीत तर गेल्या दोन-तीन वर्षांपासून अनागोंदीच माजलेली आहे. अर्थसंकल्प वेळेत मंजूर केला जात नसल्यामुळे प्रभागाच्या विकासकामांमध्ये बाधा येत आहे. नगरसेवकांना आपल्या प्रभागातील समस्यांचा निपटारा करण्यात येत नाही. जनतेच्या समोर नगरसेवकांना मान खाली घालावी लागत आहे. महासभा नियमानुसार होतच नाही. त्यामुळे चुकीचे ठराव पारीत केले जात आहेत. या ठरावांची अंमलबजाणी प्रशासनाकडून होऊ नये, अशा मागण्या विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण आणि ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या.
त्यावर शरद पवार यांनी, सभागृह सर्व सदस्यांना खुले करुन थेट महासभा घेण्याचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष महासभा घेण्यासंदर्भात आपण संबधितांशी चर्चा करणार आहोत; ठाणे पालिकेतील अनागोंदी संदर्भातही आपण संबधितांशी चर्चा करु, असे आश्वासन दिले.
दरम्यान, प्रत्यक्ष महासभा घेण्यासाठी आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे अन् गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचीही भेट घेणार आहोत, असे शानू पठाण यांनी सांगितले.

 320 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.