ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज्यदिन उत्साहात साजरा होणार
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारणार
ठाणे – ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयात येत्या ६ जून रोजी शिवस्वराज्यदिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून अभिवादन करण्यात येणार आहे. राज्यभर प्रथमत:च हा कार्यक्रम एवढ्या भव्यदिव्य स्वरुपात होत असल्याने सगळीकडे उत्सवी, चैतन्यमय वातावरण असून कार्यक्रमाची आतुरता सर्वानाच लागली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा बोऱ्हाडे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, तसेच जिल्हा परिषद पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी या कार्यक्रमाचे जि.प.पं.स.व ग्रा.पं.स्तरावर नियोजन व आवश्यक बाबींसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी पूर्वतयारी बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.त्यानुसार पंचायत समिती आणि ग्रामपंचायतमध्ये देखील उत्साहाने शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार. हा कार्यक्रम करताना शासनाने कोविड१९ चे निर्गमित केलेल्या सर्व नियमांची काटेकोरपणे पालन करण्यात येणार असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.प्र) अजिंक्य पवार यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारताचे प्रेरणास्थान आहेत, राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन होय. हे रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतन रहावे म्हणून महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक करून घेतला. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता व शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या राजसदरेवरून घोषित झाले, याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शक कर्ते ही झाले. तो हा शुभदिन होय. महाराजांनी तत्कालीन प्रस्थापित सत्तांना पालथे करुन स्वत:च्या सार्वभौम स्वराजाचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करुन रयतेची झोळी सुख समृध्दीने भरली होती आणि याच पवित्र दिवशी शिवकालगणनेला प्रारंभ झाला होता. असा हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वांतत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. असा हा दिवस या भुमी पुत्रांच्या स्वांतत्र्य दिनाचे महत्व आणखीन दृढ होण्यासाठी ६ जुन हा दिवस संपुर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन म्हणुन साजरा करण्यात यावा म्हणुन महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक दिनांक १ जानेवारी २०२१ अन्वये आदेश परित करण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये सर्व पदाधिकारी, अधिकारी / कर्मचारी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन त्यास अभिवादन करणार आहेत यावेळी महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताचे गायन करुन कार्यक्रम संपन्न होणार आहे.
474 total views, 2 views today