येऊर येथील आदिवासी पाड्यात लसीकरणाला प्रतिसाद 

शेवटच्या नागरिकापर्यंत लस पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार – महापौर नरेश म्हस्के

ठाणे – कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत ऑनलाईन नोंदणीपासून वंचित असणाऱ्या व लसीकरणासाठी शहरात ये-जा करणे शक्य नसलेल्या येऊर येथील आदिवासी पाड्यातील नागरिकांसाठी आजपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. येथील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करुन शेवटच्या नागरिकाला देखील लस मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले.

येऊरमधील पाटीलवाडी आरोग्य केंद्र येथे लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी  वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा राधिका फाटक, स्थानिक नगरसेविका परिषा सरनाईक, जयश्री डेव्हिड, रागिनी बैरीशेट्टी, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, उपवैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा ससाणे आदी उपस्थित होते.

येऊर परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासी पाडे असून येथील नागरिकांच्या मनात लसीकरणाबाबत भीती व गैरसमज आहे यामुळे लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. मात्र येथील नागरिकांचे लसीकरण होणे देखील गरजेचे असल्याने महापौर नरेश म्हस्के यांच्या  सुचनेनुसार  ठाण्यातील प्रारंभ कला ॲकॅडमी या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अरुंधती भालेराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी या परिसरात गेले दहा दिवस जनजागृती मोहिम राबविली. या जनजागृती मोहिमेअंतर्गत लस घेणे ही आरोग्याच्या दृष्टीने हिताचे असल्याचे सांगत सर्व नागरिकांना लसीचे महत्व पटवून दिले. या मोहिमेमध्ये जवळ जवळ 200 हून अधिक नागरिकांनी लसीकरणासाठी तयारी दर्शविली. या नागरिकांना ऑनलाईन नोंदणी, तसेच लसीकरणासाठी शहरात लसीकरणासाठी ये-जा करणे शक्य नसल्याने त्यांच्यासाठी लसीकरण केंद्र त्यांच्या परिसरात सुरू करण्याबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याशी चर्चा केली. आयुक्तांनी देखील या लसीकरण केंद्रासाठी तात्काळ परवानगी दिली. आज लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी येथील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु या आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, परिचारिका या उद्घोषणेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करीत असल्यामुळे निश्चितच प्रतिसाद हळहळू वाढेल व येथील एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला.

या विभागात लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी स्थानिक नगरसेवक नरेंद्र सूरकर, नगरसेविका परिषा सरनाईक, जयश्री डेव्हिड, रागिनी बैरीशेट्टी, यांनी वारंवार केली होती. त्यानुसार आज या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून नागरिकांनी लसीकरणासाठी प्रतिसाद द्यावा असे आवाहनही महापौरांनी यावेळी केले. तर आरोग्य विभागाच्या माध्यमातून या विभागातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत विश्वास निर्माण होवून त्यांना लसीकरणासाठी तयार करावे यासाठी परिसरामध्ये भित्तीपत्रके व अन्य उपाययोजना राबविण्यात याव्या तसेच याकामी सामाजिक संस्थांची देखील मदत घ्यावी अशा सूचना महापौर यांनी यावेळी दिल्या. कोविड 19 च्या सुरू झाल्यापासून या विभागात महापालिकेचे कर्मचारी, आशा वर्कर स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करीत आहे त्यांचेही महापौरांनी यावेळी कौतुक केले.

 290 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.