दिबांच्या नावासाठी आता “रामदास आठवले” उतरले मैदानात !

नवीमुंबई – नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीला आपला जाहीर पाठिंबा असून दिबांच्या नामकरण आंदोलनात आपला पक्ष सर्व शक्तिनिशी मैदानात उतरेल अशी स्पष्ट ग्वाही रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया(आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.

लोकनेते दि.बा.पाटील नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे आदी मान्यवरांच्या शिष्टमंडळाने ना. रामदास आठवले यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी आठवले बोलत होते.

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याचा प्रश्न हा राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. राज्य शासनाने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी केंद्र शासनाने करावी असा संकेत आहे. यामुळे नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या लोकभावनेचा राज्य शासनाने आदर करायला हवा. यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची भेट घ्यावी, अशी भेट व्हावी यासाठी आपण व्यक्तिशः प्रयत्न करु असे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले. तसेच दिबांच्या नावासाठी होणाऱ्या आंदोलनात आपला पक्ष व आपले कार्यकर्ते सर्वताकदीनिशी सहभागी होऊ, असेही ना. रामदास आठवले यांनी जाहीर केले. तसेच १० जूनच्या मानवी साखळी आंदोलनाला व २४ जूनच्या सिडको भवनाला घेराव घालण्याच्या आंदोलनालाही रिपब्लिकन पक्षाचा पाठिबा असल्याचेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी दिबा यांच्या नावासंबंधी भूमिका सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी ना. रामदास आठवले यांच्यापुढे विषद केली. नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला  लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे,अशी मागणी नवीमुंबई, ठाणे, रायगड,  पालघर, आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनीधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी, ओबीसी जनता सुरुवातीपासून करीत आहे. त्यासंबंधीचा पत्रव्यवहार राज्य व केंद्र  सरकारकडे करण्यात आला आहे. १९८४ साली दिबांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यातील जासई गावी, शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा म्हणून झालेल्या व देशभर गाजलेल्या शौर्यशाली अशा शेतकरी आंदोलनात पाच शेतकर्‍यांना हौतात्म्य प्राप्त झाले. या आंदोलनातुन प्रस्थापित झालेले साडेबारा टक्के विकसित जमिन प्रकल्पग्रस्तांना देण्याचे तत्त्व पुढे संबंध महाराष्ट्रातील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना लागू झाले. नवीमुंबई च्या विकासासाठी तिथल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी आपण संबंध आयुष्य खर्ची घातलं. त्यामुळे त्यांच्या या कर्मभूमीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचेच नाव देऊन त्यांची स्मृती अजरामर करणे, ही येथील सर्व जनतेची रास्त मागणी आहे, असे दशरथ पाटील यांनी म्हटले.

 359 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.