ठाण्यात सायंकाळी ५ पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची व्यापाऱ्यांची मागणी

भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ठाणे – शहरातील व्यापाऱ्यांना १ जूनपासून सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत आस्थापना व दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी व्यापाऱ्यांनी गेल्या ५५ दिवसांपासून दुकाने बंद ठेवली. मात्र, आता लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ करण्यात आल्यामुळे व्यापारी व्यथित आहेत. शहरात छोट्या व्यापाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. बहूसंख्य छोटे व्यापारी भाड्याने जागा घेऊन व्यवसाय करतात. त्यांच्यावर लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक संकट कोसळले. त्यातच वीज बिल, मालमत्ता बिलाचे ओझेही व्यापाऱ्यांवर टाकण्यात आले. या ओझ्याखाली छोटा दुकानदार कोलमडून गेला आहे. एका दुकानदारामागे किमान तीन ते चार कुटुंबे अवलंबून असतात. तर मोठ्या दुकानामागे किमान १५ ते २० कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू असतो. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून व्यापाऱ्यांबरोबरच हजारो कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. या कुटुंबांबाबत सहानुभुतीने विचार करण्याची गरज आहे, असे भाजपाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आमदार व जिल्हाध्यक्षा निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात आमदार संजय केळकर, व्यापारी आघाडीचे प्रमुख मितेश शाह यांचा समावेश होता.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली. त्यामुळे ठाणे शहरात सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने व आस्थापना उघडण्यास परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षाचालक, घरेलु कामगारांप्रमाणे छोट्या व्यापाऱ्यांसाठीही पॅकेज जाहीर करण्याची मागणी राज्य सरकारकडे पोचवावी, अशी मागणी भाजपाने निवेदनाद्वारे केली आहे.

 239 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.