सिव्हिल रुग्णालयात प्रथमच लहान मुलांसाठी दोन व्हेंटिलेटर

आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून प्रदान

ठाणे – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात प्रथमच लहान मुलांसाठी दोन व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याकडे दोन्ही व्हेंटिलेटर प्रदान केले. या व्हेंटिलेटरमुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील मुलांना कोरोनाबरोबरच अन्य आजारांसाठी उपचार होण्यास मदत होईल.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निरंजन डावखरे यांनी सिव्हिल रुग्णालयातील सुविधांची माहिती घेतली होती. त्यावेळी त्यांना लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने आमदार निधीतून दोन व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शासकीय पातळीवर तातडीने निविदा प्रक्रिया राबवून फिलिप्स कंपनीचे दोन दर्जेदार व अद्ययावत व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले. त्यानंतर आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याकडे आज दोन्ही व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांची उपस्थिती होती.
ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाबरोबरच पालघर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होतात. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सिव्हिल रुग्णालयाकडून चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात आले. आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना आवश्यक उपचारांसाठी व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले आहेत. त्याचा जिल्ह्यातील मुलांना फायदा होईल. विशेषत: या व्हेंटिलेटरमध्ये लहान मुलांबरोबरच प्रौढ व्यक्तींच्याही उपचाराची सुविधा आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील व्यक्तींना व्हेंटिलेटरचा वापर होईल, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सिव्हिल रुग्णालयातर्फे मनोरुग्णालयातील इमारतीत लहान मुलांसाठी अद्ययावत कक्ष उभारला जात आहे. या कक्षासाठी दोन्ही व्हेंटिलर उपयुक्त ठरतील, अशी माहिती शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. कोरोना रुग्णांबरोबरच कमी वजनाची मुले, न्युमोनिया झालेल्या मुलांसाठीही व्हेंटिलेटरचा वापर करता येणार आहे. यापूर्वी आमदार निरंजन डावखरे यांनी सिव्हिल रुग्णालयाला अद्ययावर रुग्णवाहिका दिली होती. आता दोन व्हेंटिलेटर दिल्याबद्दल डॉ. कैलास पवार यांनी आभार मानले.

 227 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.