ठाण्यात  खाजगी लसीकरणाला मिळणार गती 

 भाजपा आमदारांचा पुढाकार

ठाणे – ठाण्यात लसीकरणाला अपेक्षित गती मिळण्यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देऊन त्याची सक्षमपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी ठाण्यातील भाजपा आमदारांनी पुढाकार घेतला असून त्यांनी वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून रुग्णालय प्रतिनिधींची बैठक घेतली.

ठाणे शहर मतदारसंघाचे आमदार संजय केळकर आणि विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी शहरात लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेकडे ज्या रुग्णालयांनी लसीकरणासाठी अर्ज केले होते त्यांना मान्यता मिळविण्यासाठी आ. केळकर यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली होती. त्यावेळी आयुक्तांनी तत्काळ ७२ रुग्णालयांना मान्यता दिली होती.

पुढील काळात रुग्णालये, नागरिकांचे समूह आणि स्वयंसेवी कार्यकर्ते यांच्या समन्वयातून थेट गृह संकुलांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असून नागरिकांना लस मिळावी, त्याचे योग्य नियोजन केले जावे याबाबत रुग्णालय प्रतिनिधींच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. लस उपलब्ध झाल्यावर मोठ्या प्रमाणात या मोहिमेची अंमलबजावणी करण्याचा मानस आ. केळकर आणि आ. डावखरे यांनी व्यक्त केला. बैठकीत आयएमएचे अध्यक्ष संतोष कदम, वैद्यकीय आघाडीचे राहुल कुलकर्णी, डॉ. महेश जोशी, गटनेते मनोहर डुंबरे, मिलिंद पाटणकर उपस्थित होते.

 469 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.