सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

भिवंडी – ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात दबदबा असलेले शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वासह आपला ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे शनिवारी दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेला  मोठे खिंडार पडणार आहे.

२०१४ ची लोकसभा निवडणूक मनसे कडून लढविल्या नंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती.  या साठी सेनेने त्यांच्यावर कारवाई म्हणून तब्बल दोन वर्षे त्यांना निर्णयप्रक्रियेपासून बाजूला ठेवून कोणतीही जबाबदारी सोपविली नव्हती.

सेनेच्या या दुर्लक्षित धोरणामुळे बाळ्या मामा यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर आपले वैयक्तिक कारण पुढे करीत सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी शिवसेना सदस्य पदा बरोबरच आपला जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.

बाळ्या मामा कांग्रेसचा हात धरण्याची शक्यता

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बाळ्या मामा यांच्या घरी आले होते तेव्हापासूनच बाळ्या मामा हे काँग्रेस मध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती . त्यातच आता बाळ्या मामा यांनी आपला राजीनामा दिल्यामुळे ते काँग्रेस सोबत घरोबा करणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यासह जिल्ह्यात सुरु आहे.

त्याचबरोबर आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच बाळ्या मामा यांनी हा राजीनामा दिला असल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठे खिंडार पडणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

 356 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.