आमदार संजय केळकर यांची आयुक्तांकडे मागणी
ठाणे – ठाणे महापालिकेच्या बाळकुम येथील ग्लोबल कोविड सेंटरच्या कंत्राटदाराच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी पुढे येत असून याबाबत चौकशी करून त्याचा ठेका रद्द करण्यात यावा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.
शहरातील नालेसफाई, लसीकरण आणि ग्लोबल रुग्णालयाच्या विविध समस्यांबाबत आमदार संजय केळकर यांनी आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अनेक तक्रारी निदर्शनास आणून देत काही सूचनाही केल्या. ग्लोबल रुग्णालयाच्या कंत्राटदाराच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी आहेत. या रुग्णालयात शेकडो बेड असून रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांना दोन-दोन महिने पगार दिला जात नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांची माहिती दिली जात नाही. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाबद्दलही तक्रारी असल्याचे केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. येथील फ्रंट वर्कर्स कंत्राटी पद्धतीवर जरी काम करत असले तरी त्यांना किमान वेतन देण्यात येते की नाही, त्यांना अन्य सेवा-सुविधा दिल्या जात आहेत की नाही याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. केवळ कंत्राट घेऊन रुग्णालय चालवणे यापेक्षा योग्य कारभार करणे हे महत्वाचे असल्याने या कंत्राटदाराच्या कारभाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणीही कामगार उपायुक्तांकडे केल्याची माहिती केळकर यांनी दिली.
नालेसफाई बाबतही केळकर यांनी आयुक्तांकडे तक्रारींचा पाढा वाचला. गेल्या वर्षी नालेसफाई परिपूर्ण न होता बिले काढण्यात आली. ही ठाणेकरांबरोबर ठाणे महापालिकेचीही फसवणूक झाली आहे. यंदा मात्र १०० टक्के नालेसफाई व्हायला पाहिजे. याची जबाबदारी त्या-त्या सहायक आयुक्तांकडे देण्यात आली आहे. नालेसफाई झाली नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या-त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच आयुक्तांनी प्रत्यक्ष नालेसफाईची पाहणी करावी, अशी मागणीही केळकर यांनी आयुक्तांकडे केली.
७२ खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी
ठाणे शहराजवळील अन्य शहरांमध्ये लसीकरण सुरू असताना ठाण्यात मात्र लसीकरणाची मोहीम मंदावली आहे. खासगी रुग्णालयांना लसीकरण करण्याचे अधिकार दिल्यास लसीकरणाला वेग येईल, असे केळकर यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी आयुक्तांनी स्थगिती असलेल्या ८५ पैकी ७२ खासगी रुग्णालयांना लसीकरणास तत्काळ परवानगी दिल्याची माहिती केळकर यांनी दिली.
395 total views, 1 views today