धोंडू बाजी चव्हाण निवर्तले

सहकारी पतसंस्थाना पुनर्जीवित करण्याचे केले होते काम   

खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पतसंस्थाना पुनर्जीवित करणारे, तब्बल पन्नासवर्षांहून अधिक काल सहकार क्षेत्रात भरीव योगदान देणारे,सहकारी महर्षी म्हणून नाव लौकिक मिळवलेले धोंडू बाजी चव्हाण २२ मे ला निर्वतले. ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडं, सून, जावई असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

चव्हाण हे तालुक्यातील सुकीवली गावचे रहिवासी व प्रतिष्ठित नागरिक होते. अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातला त्यांचा जन्म. शांतपणे केवळ कामाला महत्व देत त्यांनी अनेक पतसंस्थेत सचिवपदी काम करून संस्थांच्या प्रगतीसाठी कार्यरत राहिले. शिवाय बंद पडलेल्या अनेक सहकारी संस्था सुरू करून पुनर्जीवित केल्या. यामध्ये १) मोहाने विकास सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड मोहाने
२) ऐनवली विकास सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड. ऐनवली.
३) सुकिवली विकास सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड
 ४)  जिल्हा सुपरविझन को. ऑप. सोसायटी लिमिटेड रत्नागिरी
५) संत सेना नाभीक व्यवसाय सहकारी संस्था खेड.
६.)विश्वेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेड
७) शामराव पेजे नागरी सहकारी पतसंस्थेचा समावेश आहे.

निस्वार्थी, निस्पृह भावनेने त्यांनी नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र कार्य केले. समाजाच्या खेड तालुका नाभिक समाज संस्थेची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली तसेच संत सेना नाभिक व्यवसाय सहकारी संस्थेची स्थापना करून समाजाच्या आर्थिक प्रगतीचा पाया रचला. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता समाजाच्या उद्धारासाठी ते सदोदित कार्यरत राहिले. नुकतेच त्यांनी अपंग एकता विकास सेवा संस्थेची स्थापना करून अपंगाच्या न्याय हक्कासाठी देखील त्यांनी काम केले. तसेच काही काल त्यांनी जागृतदेवस्थान असणाऱ्या कालकाई देवी मंदिर ट्रस्टचे देखील आर्थिक कामकाज पाहिले. त्याचबरोबर गाव विकासासाठी त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले असून गाव विकासाच्या विविध कमिटीवर ते कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी गावात गावतलाव बांधण्यासाठी तब्बल पाच गुंठ जागा त्यांच्या आईच्या नावाने दान स्वरूपात ग्रामपंचायतीला दिली.

संघर्षमय जीवनगाथा

धोंडू बाजी चव्हाण हे एका गरीब शेतकऱ्याचा कुटुंबात जन्मले. अवघे २ वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. अत्यंत बेताची परिस्थिती जीवन जगत त्यावेळी त्यांनी ११ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. वयाच्या १२ वर्षांपासून प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी करून मुंबईला रात्र शाळेत शिक्षण केले.  अंतिम परीक्षेला बसण्याच्या वेळेस त्यांची प्रेस मध्ये उजव्या हाताची बोटे तुटली गेली. स्वतःवर ओढवलेल्या संकटातून बाहेर पडत नाहीत तोवर गावाला त्यांच्या आईचे दुर्दैवी निधन झाले.  त्यामुळे त्यांना नोकरी सोडुन गावी परतावे लागले. अत्यंत हलाखीच्या परिस्थिती जीवनाचा गाढा त्यांनी हाकला.  गावी आल्यानंतर त्यांनी शेतीची कामे करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे शिक्षण व परिस्थिती पाहुन गावातील काही वरीष्ठ मंडळानी  धान्य सोसायटी मध्ये सचिव म्हणुन काम दिले. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा मार्फत कोल्हापुरला जाऊन लोअर डिल्पोमा इन को. ऑप. ( एल.डी.सी.कोर्स ) कोर्स त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर तब्बल 50 हुन अधिक वर्ष सहकार क्षेत्रात कार्यरत राहिले.  कधीच प्रकाशझोतात न येता कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता त्यांनी केवळ कामाला महत्व दिले.

समाजाचा हिरा हरपला

धोंडू बाजी चव्हाण यांनी निःस्वार्थी भावनेने समाजासाठी वेळ दिला. त्यांना समाजाप्रती प्रचंड तळमळ होती. समाजाच्या प्रगतीसाठी निर्माण केलेल्या संत सेना पतसंस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता एवढेच नव्हे तर त्यांनी या पतसंस्थेच्या सचिवपदी काही महिने बिनपगारी काम केले. त्यांचं मार्गदर्शन तरुणांना लाजवेल असे होते. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारे  समाजाचे नुकसान झाले आहे. समाजाचा हिरा हरपला अशी भावना नाभिक समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

 324 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.