मच्छीमारांच्या आक्रोश समजून जीआर बदलून मदत करावी –  आमदार अँड आशिष शेलार

ससुन डाँक, मढ, खार दांडा, माहिम येथे प्रचंड नुकसान वरळीत कोव्हलँन्ड जेटीला अद्याप पंचनामेच नाहीत

मुंबई – तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांचा आक्रोश सरकारने समजून घेऊन सध्याच्या जीआर मध्ये बदल करून मच्छिमार बांधवांना मदत करणे आवश्यक आहे, असे मत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देऊन हा मच्छीमारांचा आक्रोश समजून घेणे आवश्यक आहे, असेही आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या किनारपट्टीचा भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार आणि भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी दोन दिवसाचा दौरा केला. पहिल्या दिवशी वसई डहाणू, सातपाटी या पालघर मधील परिसराची पाहणी केली. तर आज त्यांनी ससून डॉक, वरळी माहीम, वर्सोवा, मढ या बंदरांना भेटी देऊन मच्छीमार बांधवांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच मच्छिमार बांधवांची संवाद साधला.

ससून डॉक येथील सुमारे ५५ बोटींचे नुकसान झाले असून मासेमारीचे साहित्य, जाळी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्याच्या जीआर नुसार आम्हाला मदत मिळू शकत नाही कृपया सरकारने आमचे नुकसान समजून घेऊन मदत करावी अशी विनंती येथील ससुन डाँक फिशरमेन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

त्यानंतर वरळी येथील कोव्हलँन्ड जेटीला आमदार अँड आशिष शेलार यांनी भेट दिली असता येथे दोन बोटींचे प्रचंड नुकसान झाले असून जेटीही फुटली आहे. मात्र अद्याप या ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे आमच्या नुकसानीचे पंचनामे करा अशी विनंती कोळी बांधव करीत होते.

माहीम रेतीबंदर कोळीवाडा गावठाण रहिवासी संघ येथे आमदार आशिष शेलार यांनी भेट देऊन मच्छिमार बांधवांशी संवाद साधला तेव्हा त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.. सहाहून अधिक बोटींचे नुकसान झाले असून खलाशी ही बुडाले आहेत. त्यामुळे आम्हाला तातडीने भरीव मदत द्या, अशा मागणीचा टाहो हे बांधव फोडत होते. आमचा पोटापाण्याचे साधनच हिरावून घेतले आहे. त्यामुळे मच्छीमार महिलां आक्रोश करीत होत्या.

त्यानंतर वर्सोवा येथील बोटींचे नुकसा तर झालेच शिवाय जाळी आणि अन्य साहित्य वाहून गेले आहे. तर मढ येथील कोळी बांधवांचे सर्वात जास्त नुकसान झाले असून ४० हून अधिक बोटी फुटल्या, बुडाल्या आहेत. जाळी वाहून गेली. काही बोटींच्या इंजिनमध्ये पाणी शिरले व नादुरुस्त झाले आहे.
मढ येथील कोळी महिला तर रडून आपले दु:ख सांगताना आपले आता कसे होणार? आम्ही कसे पोट भरणार? आम्ही पोराबाळांना काय खायला घालणार? असा आक्रोश करुन मदतीसाठी आर्जव करीत होत्या.

असेच नुकसान खार दांडा येथील बोटींचे झाले आहे. या वादळाचा फटका खार दांडा बंदराला ही मोठा बसला आहे.

दरम्यान आमदार अँड आशिष शेलार यांनी त्यांना धीर देऊन शासन मदत करेल. आपला आवाज आम्ही सरकार पर्यंत पोहचवू. राज्य शासनाचा सध्याचा मदतीचा जीआर तोकडा असून त्यामध्ये बदल करुन बोटींचे नुकसान, नादुरुस्त इंजिन, जाळी,
मच्छीचे ट्रै या सगळ्या बाबींचा समावेश करुन मदत देणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने जीआर बदलने आवश्यक आहे. आम्ही सरकारला त्याबाबत विनंती करु. दोन दिवस पालघर पर्यंतच्या मच्छीमारांना भेटून आम्ही जे पाहिले, निवेदने स्विकारली आहेत त्यातील सर्व  बाबींचा समावेश करुन मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देऊन आम्ही शासनाला ही दाहकता लक्षात आणून देऊ , असे आश्वस्त केले. तसेच भाजपा तर्फे ही प्राथमिक स्वरूपात मदत करु असे आश्वस्त केले.
या दौऱ्यात आमदार राहुल नार्वेकर, भारती लव्हेकर, नगरसेविका शितल म्हात्रे, विनोद शेलार, कमलाकर दळवी, अक्षता तेंडुलकर, आर. यु. सिंग, सुनील कोळी यांच्यासह भाजपा स्थानिक पदाधिकारी आपापल्या विभागात उपस्थितीत होते.

 528 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.