ठाणे – ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ५ म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आले आहे. दरम्यान म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता उपचार करून घ्यावेत असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
कोरोना झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या नवीन बुरशीजन्य रोगाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. परंतु वेळेत योग्य उपचार घेतल्यास म्युकरमायकोसिस पूर्ण बरा होऊ शकतो. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने हे शक्य करून दाखवले असून ५ म्युकरमायकोसिस रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आहे.
ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयाकडून म्युकरमायकोसिसचे हे ५ रुग्ण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे पाठविले होते. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने तात्काळ या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जून ते ऑगस्ट महिन्यात २ रुग्णावर तर दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत ३ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून योग्य उपचारांनंतर सर्व रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत.
म्युकरमायकोसिसच्या उपचार पद्धतीसाठी डेंटिस्ट, ईएनटी सर्जन आणि आय स्पेशालिस्ट, भूलतज्ञ अशा डॉक्टरांच्या एकत्रित टीमने या सर्व शस्त्रक्रिया केल्या आहेत. यामध्ये मेडिसिन विभागाचे डॉ. योगेश शर्मा, डॉ. सुमन राठोड, शस्त्रक्रिया विभागाच्या डॉ. श्वेता बाविस्कर तसेच डॉ. अमोल खळे या तज्ञ डॉक्टर्स यांचा समावेश आहे.
471 total views, 1 views today