माकपच्या पुढाकाराने झालेल्या कोविड सेंटर ला जनतेची पसंती

कोविड केअर सेंटर चे समर्पित कोविड आरोग्य केंद्र मध्ये रूपांतर करू – आ. विनोद निकोले

तलासरी – तलासरी तालुक्यातील उधवा आश्रमशाळा येथे माकप आणि आदिवासी प्रगती मंडळाच्या पुढाकाराने काढलेल्या १०० खाटांच्या कोविड केअर सेंटरला जनतेची पसंती येत असून मोठा दिलासा मिळत आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर (CCC) चे समर्पित कोविड आरोग्य केंद्र (DCHC) मध्ये रूपांतर करू असे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी आश्वासन दिले आहे.

डहाणू व तलासरी तालुक्यामध्ये कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बेडची संख्या कमी पडत होती. त्यामुळे रुग्णालयांवर मोठा ताण निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने गेल्या महिन्यात २५ एप्रिल रोजी तलासरी तालुक्यातील आदिवासी प्रगती मंडळाची उधवा आश्रमशाळा येथे १० ऑक्सिजन व ९० सीसीसी अशा एकूण १०० बेडची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरची (CCC) निर्मिती करण्यात आली. या कोविड केअर सेंटरला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात रुग्णांसाठी टीव्ही, वाचनालय, कॅरम अशा अनेक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. हे सेंटर सध्या कोविड केअर सेंटर (CCC) म्हणून आहे व आता त्याला अजून अद्ययावत करण्यासाठी समर्पित कोविड आरोग्य केंद्र (DCHC) मध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रशासन, आमदार व सभापती प्रयत्न करीत आहेत. समर्पित कोविड आरोग्य केंद्र (DCHC) मध्ये रूपांतर झाल्यानंतर येथे कोविड रुग्णांना विलगीकरणासोबत उपचार सुद्धा चालू होतील. आदिवासी प्रगती मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार तथा माजी आमदार कॉ. लहानू कोम हे आहेत आणि सचिव माकपचे जिल्हा सचिव कॉ. बारक्या मांगात हे आहेत. हे मंडळ तलासरी व डहाणू तालुक्यात अनेक शाळा व आश्रमशाळा चालवते, तसेच तलासरीत कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चालवते.

या कोविड केअर सेंटर (CCC) चे उद्घाटन माकपचे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी केले. याप्रसंगी तलासरी पंचायत समितीचे सभापती कॉ. नंदू हाडळ, प्रांत आधिकरी अश्विनी मांजे, तहसीलदार स्वाती घोंगडे, गट विकास अधिकारी राहुल म्हात्रे, डॉ. आदित्य अहिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रितेश पटेल, जि. प. सदस्य कॉ. अक्षय दवणेकर आदी उपस्थित होते.

 461 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.