महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार आधार

उच्च न्यायालयाकडून जिल्हा तक्रार व सनियंत्रण समिती गठित करण्याचे आदेश  

तात्काळ अंमलबजावणीची मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी  

ठाणे – हजारो सर्वसामान्य रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाला नसून त्यांनी खाजगी रुग्णालयाची बिलं स्वत:च्या खिशातून भरलेली आहेत. या रुग्णांच्या बिलाची रक्कम योजनेच्या नियमानुसार धनादेशाद्वारे त्यांना परत मिळवून देण्याची मागणी कोरोनाच्या पहिल्या लाटेत मनसेने केली हाेती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून याप्रश्नी उच्च न्यायालयाने जिल्हा तक्रार व सनियंत्रण समिती गठित करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाचे मनसेने स्वागत केले असून याबाबत तात्काळ अंमलबजावणी करत रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याची मागणी मनसेने ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

महात्मा फुले योजनेतील लालफिती कारभारात गोरगरीब रुग्णांच्या खिशाला अव्वाच्या सव्वा बिलामार्फत काञी बसत आहे. त्यामुळे कॅशलेस मेडिक्लेम योजनेत कंपनीला बिल सादर केल्यानंतर सर्व रुग्णांना रुग्णालयात भरलेल्या पैशांचा परतावा मिळतो. अगदी त्याच धर्तीवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम परत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे मागील वर्षी कोरोनामध्ये केली होती. यावेळी पाचंगे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले होते. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याचे पालकमंञी एकनाथ शिंदे यांचीही या प्रश्नी पाचंगे यांनी भेट घेतली. यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंर्तगत पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम ‘कॅशलेस मेडिक्लेम’च्या धर्तीवर परत देता येऊ शकते, असे पाचंगे यांनी पालकमंञी शिंदे यांना निर्दशनास आणून दिले. त्यानुसार शिंदे यांनीही तात्काळ याप्रश्नी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुधाकर शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. दरम्यान, गेल्या वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आणि हा प्रश्न बासनात गुंडाळून पडला होता.
मात्र मनसेच्या पाठपुराव्यानंतर या विषयाला गती मिळाली असून सध्या उच्च न्यायालयाने देखील रुग्णांच्या बिलात संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा तक्रार व सनियंत्रण समिती गठित करण्याचे आदेश दिले आहेत.

पात्र रुग्णांना तत्काळ परतावा द्यावा  
योजनेतील पात्र रुग्णांची तत्काळ यादी बनवून त्यांना परतावा मिळवून द्यावा. आधीच याप्रश्नी प्रशासनाकडून बोटचेपे धोरण स्वीकारण्यात आले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्जाऊ रकमेद्वारे हॉस्पिटलची बिले अदा केली आहेत. सध्याच्या आणीबाणीच्या काळात अशा पात्र रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना परतावा मिळाल्यास त्यांच्या डोक्यावरील भार कमी होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रश्नी तत्काळ निर्णयाची अंमलबजावणी करावी.अशी मागणी संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, मनविसे, ठाणे यांनी केली आहे. 

 622 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.