मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार

भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांची माहिती

ठाणे – मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ली असल्याने आता आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यामध्ये भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, अशी ग्वाही भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी सोमवारी एका निवेदनाद्वारे दिली.

आरक्षण हा राज्यातील मराठा समाजाच्या विकासाचा व समाजातील तरुणांच्या भवितव्याचा मुद्दा असतानाही महाविकास आघाडी सरकारने कायदेशीर लढाईत कुचराई केल्याचा आरोप आमदार निरंजन डावखरे यांनी केला. फडणवीस सरकारने या मुद्द्यावर घटनात्मक कार्यवाही करून दिलेल्या आरक्षणाचादेखील आघाडी सरकारने मुडदा पाडला. त्यामुळे यापुढे आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या नावाने व नेतृत्वात जी आंदोलने होतील. त्यामध्ये भाजपा पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात होणाऱ्या आंदोलनांमध्ये भाजपाचे कार्यकर्ते सहभागी होतील. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा भाजपाचा निर्धार आहे, असेही आमदार डावखरे यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, हे सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र वाचल्यावर उघड होते. ठाकरे सरकारने ही फसवणूक थांबवावी व समाजास न्याय मिळावा यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे. त्यासाठी होणाऱ्या प्रत्येक राज्यव्यापी आंदोलनांत भाजपाचा सक्रीय सहभाग राहील, असे ते म्हणाले. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यातही महाविकास आघाडी सरकार चालढकल करत असून त्यावरूनच आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची नकारात्मक मानसिकता स्पष्ट होत आहे, असा आरोपही श्री. डावखरे यांनी या पत्रकाद्वारे केला आहे. वेळकाढूपणा करून मराठा समाजाचा प्रक्षोभ शांत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 675 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.