प्रेमळ मित्रास आदरपूर्वक श्रद्धांजली…डॉ. जीतेंद्र आव्हाड 

ठाणे – माझ्या जिवाभावाचा व माझ्या सामाजिक विचारांना नेहमीच साथ देणारा हसतमुख राजीव सातव आज एकटा निघून गेला. राजीव सातव आणि माझी मैत्री ही जवळ-जवळ २० वर्षे जुनी होती. नेहमी हसतमुख चेहरा.  राजीव सातव कोणावर चिडलायं असं मी कधीच बघितल नाही. एक गोष्ट त्याची मला कायम आठवणीत राहील. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जरा काही तणाव निर्माण झाला कि, राजीव खूप अस्वस्थ व्हायचा. त्याचे ५-५० फोन यायचे. तो मला बोलवताना कधी ‘दादा’ बोलायचा तर कधी ‘बॉस’ बोलायचा. त्याचा फोन आला कि, त्याच सुरु व्हायचं. दादा बघ ताईंशी बोलून घे, साहेबांशी बोलून घे मी राहुलजींशी बोलतो काही होणार नाही ना… टिकल पाहिजे… टिकल पाहिजे… कसही करुन टिकल पाहिजे.

त्याची अस्वस्थता शब्दांतून जाणवायची आणि त्याचा प्रामाणिकपणा त्याहून अधिक जाणवायचा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जातीयवादी शक्तींशी लढलं पाहिजे. बहुजनांचा विचार केला पाहीजे. हा विचार त्याच्या मनात कायम असायचा. गुजरातमध्ये थोड्याश्या फरकाने काँग्रेसचे सरकार गेलं तेव्हा त्याला अतिशय वाईट वाटल होत. तेव्हा तो गुजरातचा Observer होता. मला आठवतय कि, लोकसभेची निवडणूक जेव्हा तो जिंकला. तेव्हा शेवटच्या 3 दिवसांमध्ये त्याचा मला फोन आला. कि, दादा कसही कर आणि तू एकदा तरी फेरी मारुन जा. मी खास विमानाने नांदेडला गेलो आणि नांदेडवरुन गाडी घेऊन हिंगोलीला गेलो. आणि तिथे एक मोठी सभा मी राजीव सातव साठी संबोधित केली.

राजीव खासदार झाला. दिल्लीला गेला. दुस-यांदा काय त्याने निवडणूक लढविली नाही. पण, तो गांधी कुटुंबियांच्या अतिशय जवळ होता. त्याला राहुल गांधी यांच्याबद्दल खुप आत्मियता होती. नेहमी बोलताना सांगायचा. तो मनाने खूप चांगला आहे, हुशार आहे. पण, त्याच नशीब काय आहे ते कळत नाही मला. पण, राजीवच गांधी कुटुंबियांवरती मनापासून प्रेम होत. तेवढच प्रेम त्याच शरद पवार साहेबांवरती होत. शरद पवार साहेबांना बोलताना तो ‘अद्भुत चमत्कार’ हा शब्द वापरायचा आणि शेवटी असही म्हणायचा कि, हे सगळ एकत्र करण्याची एकाच माणसाच्या अंगात ताकत आहे आणि ती म्हणजे शरद पवार साहेब.

अनेकवेळा गप्पागोष्टी रंगायच्या. फोन आला कि, १५-२० मिनिट बोलल्याशिवाय तो फोन ठेवायचाच नाही. खूप आठवणी दाटून येतात. पण, काय करणार… कोणाच चाललय त्याच्यापुढे. आपण फक्त उद्याची वाट बघत असतो आणि आज खेळ संपलेला असतो. उद्या कधी उगवतच नाही.

राजीव हॉस्पिटलमध्ये असताना डॉ. राहुल पंडीत यांनी औषधोपचार केल्यानंतर त्याच वेंटिलेटर काढण्यात आलं. वेंटिलेटर काढल्यावरती आता काय राजीव आला बाहेर. असच माझ मत होतं. त्याच्या घरच्यांचा भ्रमणध्वनी आला. आणि सहजच माझ्या तब्येतीची चौकशी केली मी आजारी असताना काय काय झाले त्यांना फक्त मनोमन खात्री करायची होती तेव्हा मी त्यांना सांगितले कि, डॉ. राहुल पंडीत येऊन गेलेत. हा जादूगार माणूस आहे. त्याने सांगितलं म्हणजे काही होणार नाही. पण, हे माझ वाक्य जे त्यांना उभारी देणार होत हे खोट ठरल. कारण मी स्वत: डॉ. राहुल पंडीत यांच्याशी बोललो होतो. तेव्हा ते मला म्हणाले होते कि, वेंटिलेटर वरुन बाहेर आला आहे. आता थोड्या दिवसात आपण त्याला सगळ्यातून बाहेर काढू. पण, या जादूगाराचीही जादू राजीववर चालली नाही.        

माझ्या या प्रेमळ मित्रास पुन्हा एकदा आदरपूर्वक श्रद्धांजली !

राजीव हे तुझ जाण्याच वय नव्हत.

 360 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.