हॉस्पिटल आहे की सायबर कॅफे; ग्लोबलमध्ये मासिक ७० हजाराचे बिल

इंटरनेटच्या अवास्तव खर्चावर नारायण पवार यांचा आक्षेप

ठाणे – महापालिकेचे ग्लोबल कोविड हॉस्पिटल आहे की सायबर कॅफे, असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. कोविड रुग्णांवर उपचारासाठी उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये कॉर्पोरेट ऑफिसएवढे मासिक ७० हजार रुपयांचे इंटरनेट बिल कसे, असा आक्षेप नारायण पवार यांनी घेतला आहे.
`महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्रिज’कडून बाळकूम कोविड हॉस्पिटल जून २०२० मध्ये ठाणे महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली. या इमारतीतील हॉस्पिटलमध्ये इंटरनेट सुविधा पुरविण्याचे काम मे. सुपर सोनिक ब्रॉडबॅंड प्रा. लि. कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने जुलै २०२० ते जून २०२१ पर्यंतच्या ८ लाख ४९ हजार ६०० रुपयांच्या बिलाला कार्योत्तर मंजुरी देण्याचा प्रस्ताव १९ मे रोजी होणाऱ्या महासभेपुढे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मान्यता दिली आहे.
हॉस्पिटलच्या प्रशासकीय कार्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. मात्र, दरमहा ७० हजार रुपये खर्च आवश्यक आहे का, हॉस्पिटल म्हणजे सायबर कॅफे आहे का, असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंगने काम दिलेला महागडा कंत्राटदार वर्षभरापासून का ठेवण्यात आला. अवास्तव बिल कमी करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणते प्रयत्न केले, असा सवाल पवार यांनी केला आहे.
ग्लोबल कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचाराला प्राथमिकता देण्याची गरज आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्याबाबत कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. मात्र, ग्लोबल हॉस्पिटलमधील कोट्यवधींच्या खर्चाची बिले आवर्जून महासभेपुढे येत आहेत, अशी टीका  नारायण पवार यांनी केली आहे.

लसीला पैसै नाहीत, पण कंत्राटदाराला मोठ्ठी बिले
ठाणे महापालिकेकडे कोरोना लसखरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. मात्र, खासगी कंत्राटदारांना लाखो रुपयांची अवास्तव बिले देण्यात येत आहेत. घनकचरा विभागातील कचऱ्याच्या कोट्यवधींच्या बिलापाठोपाठ आता आरोग्य विभागातील कंत्राटदारांनाही संगनमताने मोठ्ठी बिले दिली जात आहेत, अशी टीका ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी दिली.

 303 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.